महाराष्ट्राचा रहिवासी नसल्याने मॅरेथॉन विजेत्याला ठरविले बाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 06:05 AM2019-08-19T06:05:32+5:302019-08-19T06:05:55+5:30
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या ३० व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेत २१ किमीच्या मुख्य स्पर्धेतील विजेता पिंटू यादव याला आयोजकांनी स्पर्धेतून बाद केले.
ठाणे : महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्याच्या कारणावरून ठाणे मॅरेथॉन विजेत्याला बाद ठरवत दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात आले. मात्र, या खेळाडूला २०१७ साली द्वितीय क्रमांकासाठी पात्र ठरविल्याचे समोर आल्याने आयोजकांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या ३० व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेत २१ किमीच्या मुख्य स्पर्धेतील विजेता पिंटू यादव याला आयोजकांनी स्पर्धेतून बाद केले. यंदा मॅरेथॉन स्पर्धेत आॅनलाइन नोंदणीमुळे नवा वाद उभा राहिल्याने स्पर्धा आयोजकांची चांगलीच
गोची झाली. सुरुवातीला पिंटू यादव याची मॅरेथॉन चिप मॅच होत नसल्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर यादव हा झारखंड येथील असल्याने त्याच्याकडे महाराष्ट्रातील कुठलेही पुरावे नसल्याचे कारण स्पर्धा आयोजकांकडून देण्यात आले आणि त्यानंतर स्पर्धेत दुसºया आलेल्या करणसिंग घिसाराम याला मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले.
दरम्यान, मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा ३० वे वर्ष असूनही आयोजनात सुसूत्रता नसल्याचे दिसून आले. यंदा स्पर्धेतून बाद केलेला पिंटू यादव हा २०१७ साली पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या मुख्य मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा आला होता. तेव्हा, पात्र ठरलेला पिंटू यादव यंदाच्या स्पर्धेत अपात्र कसा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. महापालिकेने तो यापूर्वी धावलाच नसल्याचे म्हटले आहे. मात्र, केवळ महाराष्ट्राचा नागरिक नसल्याच्या कारणावरून एखाद्या खेळाडूला बाद ठरविणे हे अपमानास्पद आहे. क्रीडा मंत्रालयाने यात लक्ष घालून पिंटू यादवला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान
स्वित्झर्लंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय मॅरेथॉन स्वीम या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शुभम पवार याने २६ किमीचे अंतर ८ तास ५ मिनिटे ३४ सेकंदांत पूर्ण केले. आशिया ख्ांडातून सहभागी झालेला हा एकमेव जलतरणपटू आहे. २७ जुलै २०१९ रोजी दक्षिण कोरिया येथे झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभाग घेऊन ३ ते ६ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत माँट्रियल, कॅनडा येथे होणाºया वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पोल स्पोर्ट्स या खेळात ठाण्याच्या ओवी प्रभूने भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ठाण्याच्या प्रणव देसाई या आंतरराष्ट्रीय खेळाडूने स्वित्झर्लंड येथे पॅराआॅलिम्पिक अॅथलेटिक स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल त्याचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
‘संबंधित धावपटूची तक्रार करणार’
दरम्यान, पिंटू यादव याने नोंदणी करताना, तो नाशिकचा रहिवासी असल्याचे म्हटले आहे. त्याच्या चीपमध्ये कोणताही बिघाड झाला नव्हता. राज्याचे निरीक्षक हे नाशिकचे असल्याने त्यांनी असा खेळाडू नाशिकमधून खेळत नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, त्याने विजयानंतर कोणताही निवासी पुरावा दिला नाही. त्यामुळे त्याला अपात्र ठरवून दुसºया क्रमांकाच्या खेळाडूला प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. ही स्पर्धा राज्यस्तरीय खेळाडूंसाठी असल्याने आणि पिंटू यादव हा दुसºया राज्यातील असल्याने त्याची राज्यस्तरीय संघटनेमार्फत तक्रार केली जाणार आहे. त्यानुसार, त्याच्यावर फे डरेशन कारवाई करील. तो दुसºया राज्यातील असल्याची तक्रार स्पर्धेतील खेळाडूंकडून आल्याचेही ठाणे अॅथलेटिक संघटनेचे सचिव अशोक अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
किन्नर समाज व सलाम बालक ट्रस्टचाही सहभाग
यंदा या स्पर्धेत किन्नरही सहभागी झाले होते. आपणही याच समाजाचा एक घटक आहोत, हे या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले. समाजात एकट्या राहणाºया उपेक्षित मुलांना २४ तास मदतीचा हात देणारे सलाम बालक ट्रस्टचे पदाधिकारी मुलांसह यात सहभागी झाले होते.
- पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया ग्रीन एन्व्हायर्नमेंट फाउंडेशनचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सीडबॉम्बचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात केले. ठाणे शहरात विविध ठिकाणी असे ४० हजार सीडबॉम्ब टाकून ते वृक्षारोपणास हातभार लावणार आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेचा सविस्तर निकाल
पुरु ष - २१ किमी (राज्यस्तरीय)
करणसिंग घिसाराम (प्रथम), धनवत प्रल्हाद रामसिंग (द्वितीय), ज्ञानेश्वर मोरघा (तृतीय), मंजित सिंग (चतुर्थ), प्रल्हाद सिंग (पाचवा), विजय मोरघा (सहावा), दिनकर महाले (सातवा), राजू चौधरी (आठवा), अक्षय जितेकर (नववा), अनिल कोरवी (दहावा)
महिला -२१ किमी (राज्यस्तरीय)
आरती पाटील (प्रथम), प्राजक्ता गोडबोले (द्वितीय), अक्षया जडीयार (तृतीय), नयन किर्दक (चतुर्थ), तेजस्विनी नरेंदर (पाचवा)
१८ वर्षांवरील पुरु ष- १० किमी (राज्यस्तरीय)
किरण म्हात्रे (प्रथम), पराजी गायकवाड (द्वितीय), शेषनाथ चौहान (तृतीय), अमित माळी (चतुर्थ), छगन बोंबले (पाचवा), भगिनाथ गायकवाड (सहावा), सोमनाथ पवार (सातवा), दादासो वयभट (आठवा), शुभम राठोड (नववा), अविनाश पवार (दहावा)
१६ वर्षांवरील महिला - १० किमी (राज्यस्तरीय)
कोमल चंद्रकांत जगदाळे (प्रथम), निकिता विजय राऊत (द्वितीय), प्राजक्ता शिंदे, (तृतीय), निकिता जयदेव नागपुरे (चतुर्थ), पूजा ओडोळे (पाचवा), ऋतुजा जयवंत सकपाळ (सहावा), प्रतीक्षा प्रदीप कुळये (सातवा), कविता संजय भोईर (आठवा), प्रियंका दशरथ पाईकराव (नववा), स्वप्नाली भास्कर बेनकर (दहावा)
१८ वर्षांखालील पुरु ष -१० किमी (राज्यस्तरीय)
किशोर काशिराम जाधव (प्रथम), आकाश राजेश परदेशी (द्वितीय), संदीप रामचंद्र पाल (तृतीय), संजय मारोती झाकणे (चतुर्थ), रोहिदास विठ्ठल मोरघा (पाचवा), जयप्रकाश यादव (सहावा), अंकित भास्कर भोरे (सातवा), गोविंद राजभर (आठवा), शुभम विकास मढवी (नववा), सागर अशोक म्हसकर (दहावा)
१५ वर्षांखालील मुले - ५ किमी
जिलानी अन्सारी (प्रथम) , विकास रामविलास राजभर (द्वितीय), शशिकांत प्रदीप चौहान (तृतीय), अनिल हिरामण वैजल (चतुर्थ), अमोल कृष्णा भोये (पाचवा), मोईन शब्बीर शेख (सहावा), तुषार सुरेश कोटाल (सातवा), ओमप्रकाश पाल (आठवा), अनुप अरु ण यादव (नववा), रोहित रमेश ननवर (दहावा)
१५ वर्षांखालील मुली -५ किमी
निकिता अतुल मरले (प्रथम), परिना खिलारी (द्वितीय), काजल बाबू शेख (तृतीय), मीना दत्तात्रेय कांबळे (चतुर्थ), श्रावणी अनिल गुरव (पाचवा), साक्षी गणपत जाधव (सहावा), सिद्धी रमेश वेजरे (सातवा), वर्षा जवाहरलाल प्रजापती (आठवा), प्रतिभा चंद्रकांत खुताडे (नववा), ज्योती दिलीप धूम (दहावा)
१२ वर्षांखालील मुले
-३ किमी
शुभम अखिलेश श्रीवास्तव (प्रथम), यश संजय सुर्वे (द्वितीय), आर्यन नानासाहेब कदम (तृतीय),
१२ वर्षांखालील मुली
-३ किमी
गायत्री अजित शिंदे (प्रथम), तन्वी विजय माने (द्वितीय), साधना यादव (तृतीय),
६० वर्षांवरील पुरु ष (ज्येष्ठ नागरिक)-
हरिश्चंद्र रामचंद्र पाटील (प्रथम), किसन गणपत अरबूज (द्वितीय), चंद्रकांत गणपत गायकवाड (तृतीय)
६० वर्षांवरील महिला (ज्येष्ठ नागरिक)-
पद्मजा चव्हाण (प्रथम), मीना दोशी (द्वितीय), रेखा ताम्हणेकर (तृतीय)
रन फॉर स्मार्ट ठाणे
(२ किमी)
अनिल यादव (प्रथम), मनोज नवोर (द्वितीय), दत्ता देवकर (तृतीय), महादेव गायवत (चतुर्थ), चेतन म्हात्रे (पाचवा).