‘नोटा’ने बिघडविले दोन विद्यमान आमदारांचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:49 AM2019-10-26T01:49:41+5:302019-10-26T06:21:00+5:30
कलानींसह रूपेश म्हात्रेंना फटका; नोटाला ७५,१२९ मतदान
ठाणे : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारराजाने आपला कौल अखेर दिला आहे. या निकालाने अनेकांची आधीच दिवाळी साजरी झाली, तर काहींचे मात्र दिवाळे निघाले आहे. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ती म्हणजे या उमेदवारांपैकी कोणी नाही अर्थात ‘नोटा’ हेच बटण दाबून राज्यातील अनेक विद्यमान आमदारांना पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विद्यमान दोन आमदारांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
गुरुवारी जिल्ह्यात मतपेट्या उघडण्यात आल्या. त्यानंतर, दिवाळीआधीच कुठे रॉकेट उडाले, तर कुठे अॅटमबॉम्ब फुटले. यामुळे कुठे आनंदाचे तर कुठे दु:खाचे वातावरण होते. तर, कुठे ठासून नाही तर घासून आलो, अशी परिस्थिती होती. ठाणे जिल्ह्यात मतदारराजाने आपले कर्तव्य पार पाडले असून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे नोटांचा वापर करणाऱ्या मतदारांनी. कारण, या नोटा मतांमुळे ठाणे जिल्ह्यात दोन आमदारांना आपली आमदारकी गमवावी लागली आहे.
ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त नोटा मते पडली, ती मुरबाड मतदारसंघात. इथे तब्बल सहा हजार ७८३ नोटा मते पडली आहेत. तर, कल्याण ग्रामीण मतदारसंघात सहा हजार ८२ नोटा मते पडली आहेत. सर्वात कमी भिवंडी पूर्व मतदारसंघात एक हजार ३५८ नोटा मतदान झाले आहे. परंतु, या नोटा मतदारांमुळे भिवंडी पूर्वेचे शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे आणि उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांना फटका बसल्याचे चित्र आहे. रूपेश म्हात्रे हे एक हजार ३१४ मतांनी पराभूत झाले. त्याठिकाणी एक हजार ३५८ नोटा मतदान झाले आहे. तर, ज्योती कलानी या दोन हजार चार मतांनी पराभूत झाल्या. इथे चार हजार ९७८ नोटा मतदान झाले आहे. एकूणच नोटा मतदारांची संख्या ही मागील काही वर्षांत निवडणुकीत महत्त्वाचा वाटा उचलत असल्याचेच या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
‘नोटा’चे झालेले मतदारसंघनिहाय मतदान
भिवंडी ग्रामीण : तीन हजार ३४०
शहापूर : चार हजार ३१३
मुरबाड : सहा हजार ७८३
कल्याण पश्चिम : तीन हजार २६४
भिवंडी पूर्व : एक हजार ३५८
भिवंडी पश्चिम : एक हजार ८८६
अंबरनाथ : चार हजार ३२२
उल्हासनगर : चार हजार ९७८
कल्याण पूर्व : तीन हजार ६९०
डोंबिवली : चार हजार १३४
कोपरी-पाचपाखाडी : पाच हजार १४७
ओवळा-माजिवडा :
सहा हजार ०५४
मीरा-भार्इंदर : दोन हजार ६२३
कल्याण ग्रामीण :सहा हजार ०८२
ठाणे शहर : पाच हजार ५४७
मुंब्रा-कळवा : दोन हजार ५९१
ऐरोली : पाच हजार २१३
बेलापूर : तीन हजार ८०४
ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत एकूण ७५ हजार १२९ नोटा मतदान झाले.