१०० बिल्डरांना बजावल्या नोटिसा, पावसाळ्यात पाणी साठवून डासांची पैदास वाढवणारे रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:07 AM2019-06-09T01:07:58+5:302019-06-09T01:08:19+5:30

आरोग्य विभागाची कारवाई। पावसाळ्यात पाणी साठवून डासांची पैदास वाढवणारे रडारवर

Notaries issued to 100 builders, Radar accumulation of mosquitoes by raising water during rainy season | १०० बिल्डरांना बजावल्या नोटिसा, पावसाळ्यात पाणी साठवून डासांची पैदास वाढवणारे रडारवर

१०० बिल्डरांना बजावल्या नोटिसा, पावसाळ्यात पाणी साठवून डासांची पैदास वाढवणारे रडारवर

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीतील टायर पंक्चर काढणाऱ्या दुकानदारांनी दुकानासमोर उघड्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून त्यामुळे मलेरिया, डेंग्यू पसरवणाºया डासांची पैदास आढळल्यास अशा दुकानदारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींच्या ठिकाणी पाणी साचून राहू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक विकासकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महापालिकेची आरोग्य यंत्रणा साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड्यावर ठेवलेले निकामी टायर्स किंवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचे पाणी साचून त्यामध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्यास आणि यामुळे परिसरात मलेरिया, डेंग्यूचे डास आढळल्यास महापालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारावर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

शहराचे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स न ठेवता ते एकावर एक रचून ताडपत्रीने आच्छादित करून ठेवावेत किंवा एखाद्या बंदिस्त गोदामात ठेवावेत. त्याचप्रमाणे पंक्चर टेस्टिंगसाठी ठेवलेले पाण्याचे टब दर दोन ते तीन दिवसांनी रिकामे करून सुक्या कपड्याने कोरडे करून पुन्हा भरावे, जेणेकरून त्यामध्ये डासांच्या अळ्यांची पैदास होणार नाही, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. फायलेरिया विभागाचे २१० अधिकारी, कर्मचारी आणि प्रत्येक आरोग्य केंद्रातील १५० कर्मचाऱ्यांचा स्टाफ पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवणार आहेत.
एखाद्या ठिकाणी साथीच्या रोगांचा फैलाव वाढू लागला, तर त्या भागात जाऊन हे कर्मचारी रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणार असून त्याच ठिकाणी उपचार करणार आहेत. याशिवाय, दीड लाख भित्तीपत्रके तयार करण्यात आली असून शहरातील प्रत्येक सोसायटीला दिली आहेत. शिवाय, शुद्ध पाण्यासाठी क्लोरिनचे घरोघरी जाऊन वाटप केले जाणार आहे. डासांची पैदास वाढू नये, म्हणून खाजगी आणि सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पाइपला नायलॉन जाळ्या बसवण्याचे काम केले जाणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीत पाच फवारणी यंत्रे यानुसार नऊ प्रभाग समितीअंतर्गत १०० औषध फवारणी यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

...तर विकासकावर गुन्हा
विकासकांच्या कामांच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विकासकांची नव्याने कामे सुरू आहेत, त्यांना नोटिसा बजावण्यात येत असून एखाद्या ठिकाणी विकासकाच्या चुकीमुळे जर त्या भागात साथ रोगाची समस्या वाढल्यास त्या विकासकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशाराही ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणे, जनजागृती करणे, हे काम केले जाणार आहे.

Web Title: Notaries issued to 100 builders, Radar accumulation of mosquitoes by raising water during rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.