गणेशाला अर्पण केलेले वही आणि पेनची मदत गोरगरिबांना; झेप प्रतिष्ठानचा एक वही एक पेन उपक्रम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 11, 2022 04:34 PM2022-09-11T16:34:53+5:302022-09-11T16:35:53+5:30
आदिवासी पाड्यातील होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यासाठी झेप प्रतिष्ठानने गणेशोत्सव काळात अभिनव उपक्रम राबविला.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आदिवासी पाड्यातील होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यासाठी झेप प्रतिष्ठानने गणेशोत्सव काळात अभिनव उपक्रम राबविला. श्री गणेशाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेेले एक वही आणि एक पेन विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. या उपक्रमात तब्बल १८४ डझन म्हणजेच २२१२ वह्या आणि दीड हजार पेन जमा झाले असल्याची माहिती संस्थेने दिली.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवनिमित्त झेपने हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला होता. हार, फुले आणि प्रसादाबरोबर एक वही आणि एक पेन गणेशाच्या चरणी अर्पण करण्याचे आवाहन सर्व भाविकांना झेपने केेले होते. या आवाहनाला घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक वही आणि एक पेनचे मोठ्या प्रमाणात संकलन केले.
झेप प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. जवळपास ६५ हून अधिक शैक्षणिक उपक्रम या संस्थेने राबवले आहेत. जव्हार येथील आदिवासी पाड्यात तसेच शहरातील होतकरू मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे. यंदा गणेशोत्सवाच्यानिमित्ताने एक वही एक पेन हा उपक्रम हाती घेतला आहे. जव्हारपासून ४० किमी अंतरावर बेहेरपाडा या आदीवासी गावात शिक्षणाची मदत पोहोचवली जाणार आहे. या पाड्यात २१४ आदीवासी मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांचे पालक वीटभट्टीवरील कामगार आहेत. त्यांची मुले ही शिक्षणपासून वंचित राहू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही झेपने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता. दरवर्षी झेप प्रतिष्ठान या उपक्रमाची सुरुवात गणेशोत्सवकाळात करत असते.
एक वही एक पेन उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यात आलेली आहे अशी माहिती झेपचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांनी दिली. हायलँड पार्कचा राजा, ढोकाळी, जिवलग मित्र मंडळ, माजिवडा, श्रीसाई मित्र मंडळ, माजिवडा, अष्टविनायक मित्र मंडळ, माजिवडा, जय माता दी मित्र मंडळ, माजिवडा, चैतन्य मित्र मंडळ, वैती वाडी, ओम साई एकविरा मित्र मंडळ, वैती वाडी, आनंद राम हौसिंग सोसायटी, समता नगर, साई एकविरा मित्र मंडळ, श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राबोडी, श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राबोडी, गोपाळ गणेशोत्सव मंडळ, मासानपाडा, जय भवानी मित्र मंडळ, गोकुळ नगर, शिवसेना शाखा गणेशोत्सव मंडळ, गोकुळ नगर, कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड, शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर, ओम साई मित्र मंडळ, गोकुळ नगर, सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ, कल्याण या मंडळांनी मोलाचे सहकार्य केले.