मीरा-भाईंदर महापालिकेसमोर नोटा उधळल्या; २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: May 27, 2023 02:45 PM2023-05-27T14:45:23+5:302023-05-27T14:45:39+5:30
नवीन ठेकेदाराने पूर्वीच्या अनेक कंत्राटी कामगारांना कमी करत नवीन कर्मचारी नेमले आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातल्या खोल्या प्रशासनाने रिकामी करायला लावल्या म्हणून पूर्वीच्या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात येऊन नोटा उडवत निषेध आंदोलन केले. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत २२ ते २७ जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या सफाई व देखभाल करणाऱ्या कंत्राटी कमर्चारीसाठी प्रत्येक शौचालयाच्यावर खोली बांधलेली आहे. २०१७ साली पालिकेने सदर शौचालयांची सफाई व देखभालचे काम लोकसेवा नागरी सहकारी संस्थेला तर २०१९ साली शाईन मेटेंनन्स सर्व्हिसला दिले होते. त्या दरम्यान ठेकेदारा मार्फत साफसफाई व नियोजनासाठी नेमलेल्या व्यक्ती ह्या कुटुंबासह शौचालय वरील खोलीत रहात होत्या. २०२३ साली सदर कंत्राट स्वामी समर्थ सिक्युरिटी हॉस्पिटॅलिटी या ठेकेदारास दिले आहे.
नवीन ठेकेदाराने पूर्वीच्या अनेक कंत्राटी कामगारांना कमी करत नवीन कर्मचारी नेमले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या ठेकेदाराने नेमलेल्या लोकांना शौचालयातेली खोली रिकामी करण्यास पालिकेने लेखी कळवले होते. मात्र अनेकांनी खोल्या खाली न केल्याने प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या सोबत जाऊन खोल्या रिकामी करून घेतल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यातील एका व्यक्तीने गळ्यात नोटांची बंडल अडकवून मुख्यालयात लोकांसह फिरून पालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच प्रवेशद्वारावर नोटा हवेत उडवत खळबळ माजवली. नोटा उडवत पालिकेचा निषेध करणाऱ्यांनी खाली पडलेल्या नोटा पुन्हा गोळा करून घेतल्या.
सुरक्षा रक्षकांनी त्यांना विरोध केला . तर या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी हेमंत कानाबार व गीता कानाबार सह अन्य २० ते २५ महिला व पुरुषांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे .
महापालिकेची मालमत्ता असून सदर कामगार हे खोली , लाईट, पाणी सर्व मोफत वापरत होते . घरामध्ये एसी, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन आदींचा वापर केला जात होता व वीजबिल पालिका भारत होती . काहींनी तर खोल्या भाड्याने दिल्या . त्यामुळे प्रशासनाने नवीन ठेकेदारास खोलीचे चार हजार भाडे, वीज व पाणी बिल भरण्याची अट टाकली आहे . त्यातच नवीन ठेकेदारा कडे काम करत नसताना देखील पालिकेच्या खोल्या कब्जा करून बसलेल्याना बाहेर काढल्याने त्यांनी हा गोंधळ घातला. - रवी पवार, उपायुक्त, महापालिका