ठाण्याच्या आनंद आश्रमात नोटांची उधळण; शिवसेना ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 05:56 AM2024-09-14T05:56:26+5:302024-09-14T05:57:33+5:30
सोशल मिडियावर चित्रफित व्हायरल: आरोप प्रत्यारोपांचे ढोल ताशे
जितेंद्र कालेकर
ठाणे - शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आनंद (मठ) आश्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण केल्याची एक चित्रफित समाजमाध्यमांवर शुक्रवारी व्हायरल झाली. याच चित्रफितीवरुन कै. दिघे यांचे पुतणे आणि उद्धव गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावर समाजमाध्यमांद्वारे टीका केली आहे. तर शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी पैसे उधळणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. मात्र ज्यांना ओवाळून टाकले आहे, त्यांनी आम्हाला दिघे साहेब काय आहेत ते शिकवू नये, अशी प्रतिक्रीया प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.
दिघे यांच्या तसबीरीवरून पैसे ओवाळून त्या पैशांची उधळण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर या प्रकारावर उद्धव गटाचे केदार यांनी दिघे यांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. त्यामुळे आमचा आनंद हरपला, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली . गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक दरवर्षी यंदाही गुरुवारी आनंद आश्रमासमोर जाताना, ढोल ताशा पथकासह लहान मुले आश्रमात गेली. त्याठिकाणी ढोल ताशा पथकाच्या ठेक्यावर ही मुले नाचत होती. मात्र यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केल्याचा आरोप आहे.
तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….
— Kedar Dighe (@MiKedarDighe) September 13, 2024
दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…
आमचा आनंद हरपला ! @TV9Marathi@saamTVnews@zee24taasnews@abpmajhatv@lokmat@SaamanaOnlinepic.twitter.com/C5xKkoaTvk
इतकेच नव्हे तर दिघे यांच्या फोटोवरून पैसे ओवाळून ते उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे काही कार्यकर्ते दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिवसैनिकांकडून सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गुरुवर्य आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या विचाराला कधी समर्थ ठरलो नाहीत, असे उपरोधिकपणे म्हणत दिघे साहेब घात झाला. तेही आपल्याच लोकांकडून असेही यात म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.