ठाण्यात १२६ आस्थापनांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:54+5:302021-02-24T04:41:54+5:30
ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ...
ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या ३४४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच १२६ मंगल कार्यालये, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांनाही नोटिसा बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांना सतर्कतेच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विशेषत: मास्क परिधान न करणाऱ्या ३४४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्याचबरोबर कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच १२६ मंगल कार्यालये, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच नियम डावलून घेतल्या जाणाऱ्या बैठकांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली असून, आतापर्यंत पाच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
११२ ठिकाणी जनजागृती
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांत विशेष पथके स्थापन करून कारवाई सुरू केली आहे. तसेच दुकान, हॉटेल आणि इतर आस्थापनांमधील कामगारांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
‘कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सर्वांनीच वैयक्तिक जबाबदारी समजून खबरदारी घेतली पाहिजे. ठाणे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या ३४४ जणांविरुद्ध ठाणेत कारवाई केली आहे. कारवाई आणि आजार टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.’
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर