पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:25 AM2018-05-08T05:25:15+5:302018-05-08T05:25:15+5:30
राज्यव्यापी पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना ठाणे पोलिसांनी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास रोखणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या संदर्भात आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास पोलिसांनी सांगितले.
ठाणे - राज्यव्यापी पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना ठाणे पोलिसांनी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास रोखणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या संदर्भात आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास पोलिसांनी सांगितले.
पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाºया डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सर नामक यंत्र असते. या यंत्रामध्ये हेराफेरी करून, ग्राहकांना कमी इंधन देणाºया पेट्रोल पंपांवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. ५७ आरोपींचा शोध सुरू आहे.
या घोटाळ्यातील आरोपी पंप मालकांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने डिसेंबर २0१७ मध्ये मंजूर केले. सहा पेट्रोल पंपमालकांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली होती. पेट्रोल पंप घोटाळ्याचा तपास पूर्णत: तांत्रिक स्वरूपाचा असल्याने तो सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून पोलिसांना या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले.
ठाणे पोलिसांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पेट्रोल पंपांवरील कारवाईदरम्यान वजन व मापे निरीक्षक कार्यालयासह संबंधित आॅइल कंपन्यांच्या अधिकाºयांनाही पोलिसांनी सोबत घेतले होते. संपूर्ण कारवाई नियमाला धरून असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, सर्वोच्च न्यायालय आता दुसरी बाजू जाणून घेणार आहे. त्यासाठी आरोपी पंप मालकांना नोटिसा बजावण्याचे काम ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ने सुरू केले आहे. पंप मालक आणि आॅइल कंपन्यांच्या प्रतिनिधींसह या प्रकरणाशी संबंधित ३५ जणांना नोटिसा बजावल्या जात आहेत.