रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाईची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:19+5:302021-09-27T04:44:19+5:30
ठाणे : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ठाणे ...
ठाणे : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा.लि. या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. रस्ते दुरुस्तीची कामे तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशाने झाली.
यापूर्वी केलेले काम योग्य दर्जाचे न झाल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदारास कामांचे देयक अदा करण्यात येणार नसल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनेनुसार ठरावीक वेळेत काम पूर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तींनुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा तीन दिवसांत करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले आहेत. या कालावधीत कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार नौपाडा-कोपरी प्रभाग समिती तसेच उथळसर आणि वर्तकनगर प्रभाग समितीमधील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखून पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही दिले आहेत.