आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाच्या कंत्राटदारास नोटिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:54+5:302021-05-14T04:39:54+5:30
कल्याण :कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाच्या विरोधात प्रशासनास अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ...
कल्याण :कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाच्या विरोधात प्रशासनास अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे महापालिका प्रशासनाने त्याच्या कंत्राटदारास नोटिस बजावून खुलासा मागविला आहे.
महापालिकेने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी गतवर्षीपासून जम्बो कोविड सेटअप उभारला. त्या अंतर्गत सात कोविड रुग्णालये महापालिकेने सुरू केली. त्यापैकी आर्ट गॅलरी हे कोविड रुग्णालय महापालिकेने तयार केले होते; मात्र कोविडची पहिली लाट ओसरल्याने ते उपचारासाठी खुले केले नव्हते. दुसरी लाट सुरू होताच महापालिकेने हे रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाला तक्रारी केल्या गेल्या आहेत. रुग्णांच्या उपचाराविषयी नातेवाइकांना योग्य माहिती दिली जात नव्हती. रुग्ण बरा असल्याचे सांगून लगेच तो नंतर दगावला असल्याची माहिती दिली जात होती. नुकतीच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तक्रार केली होती की, रुग्ण दगावला असता तो जिवंत असल्याची माहिती दिली गेली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रुग्णालयाच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला होता. नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या या तक्रारीच्या आधारे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या कंत्राटदारास नोटिस बजावून या तक्रारींवर खुलासा मागविण्यात आला आहे. तो प्राप्त झाला नाही तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
--------------------