डीपीडीसीला गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Published: January 8, 2016 02:03 AM2016-01-08T02:03:31+5:302016-01-08T02:03:31+5:30
जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक असतानाही काही जबाबदार अधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले
ठाणे : जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक असतानाही काही जबाबदार अधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संतापलेल्या अवस्थेत संबंधिताना तातडीने कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना दिले.
या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी समोरासमोर येऊन जनहिताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, काही विभागांचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहत असल्याचे उघड झाले. याआधीचा अनुभवही कडवट असल्यामुळे या दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची दखल घेऊन त्यांना नोटीस देण्याचे त्यांनी तत्काळ निर्देश दिल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बैठकीस खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, नरेंद्र पवार, पांडुरंग बरोरा, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, रवींद्र चव्हाण, ज्योती कलानी यांनीदेखील महत्त्वाचे मुद्दे बैठकीत मांडले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, कल्याण-डोंबिवली मनपा उपायुक्त संजय घरत, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी मीना यादव आदी उपस्थित होते.