मीरा-भार्इंदरच्या ५ नगरसेवकांना नोटिसा

By admin | Published: November 19, 2015 12:40 AM2015-11-19T00:40:37+5:302015-11-19T00:40:37+5:30

अनधिकृत बांधकामांशी संबंधित नगरसेवकांच्या संदर्भातील तक्रारींची सुनावणी करण्यास आयुक्त अच्युत हांगे यांनी बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे अशा तक्रारी असलेल्या

Notice to five corporators of Meera-Bharinder | मीरा-भार्इंदरच्या ५ नगरसेवकांना नोटिसा

मीरा-भार्इंदरच्या ५ नगरसेवकांना नोटिसा

Next

- धीरज परब,  मीरा रोड
अनधिकृत बांधकामांशी संबंधित नगरसेवकांच्या संदर्भातील तक्रारींची सुनावणी करण्यास आयुक्त अच्युत हांगे यांनी बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे अशा तक्रारी असलेल्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
आयुक्त हांगे यांनी पाच तक्रारदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सचिव हरेश पाटील यांना या नगरसेवकांना नोटिसा बजावण्याची सूचना केली. त्यानुसार, येत्या २४ नोव्हेंबर रोजी आयुक्त दालनात सुनावणीसाठी बोलवले आहे. नगरसेवकांवरील अपात्रतेची कारवाई लालफितीत... या मथळ्याखाली ५ नोव्हेंबरच्या लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
मीरा-भार्इंदर महापालिकेत अनधिकृत बांधकाम प्रकरणातील नगरसेवकांची सात प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये विद्यमान भाजपा आमदार तथा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक स्टीव्हन मेंडोन्सा, सध्या भाजपाशी जवळीक साधलेले काँग्रेसचे हंसुकुमार पांडे, सध्या भाजपात असलेल्या माजी नगरसेविका नयना म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लियाकत शेख व त्यांची नगरसेविका पत्नी शबनम शेख यांचा समावेश आहे. नयना म्हात्रे यांनी मुर्धा येथील सरकारी जागेत तर स्टीव्हन मेंडोन्सा यांनी उत्तन-चवळी येथील सरकारी जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची तक्रार अनुक्रमे अरविंद गुप्ता व मिलन म्हात्रे यांनी केली होती. म्हात्रे व मेंडोन्सा यांना अपात्र ठरवण्यासाठी प्रकरण न्यायालयाकडे पाठवण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी महासभेपुढे ठेवला असता महासभेने तो फेटाळला होता. त्यानंतर, पालिका प्रशासनाने या प्रकरणी आजतागायत काहीच कार्यवाही केली नाही.

नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित सेव्हन स्क्वेअर शाळेच्या ८ व्या मजल्याचे वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिकेने घोषित केल्याने त्यांचे पद रद्द करावे, अशी तक्रार साजी आय.पी. यांनी केली होती. हंसुकुमार पांडे यांनी आपल्या जेसल पार्क येथील राहत्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार राजू विश्वकर्मा यांनी केली असून पालिकेनेदेखील वाढीव अनधिकृत बांधकाम असल्याने दिलेला भोगवटा दाखला रद्द केला आहे. लियाकत शेख व शबनम शेख यांनी उत्तन येथे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांचे पद रद्द करण्याची मागणी सय्यद मोईनुद्दीन यांनी केली आहे.

नयानगर येथील बांधकामावर
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकास विरोध करून ते तोडण्यास अडथळा आणल्यानेजुबेर इनामदार यांचे पद रद्द करण्याची तक्रार सय्यद गुलामनबी यांनी केली आहे.

Web Title: Notice to five corporators of Meera-Bharinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.