मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीचा ठामपाला दणका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:46+5:302021-04-26T04:36:46+5:30

ठाणे : कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ठाणे महापालिकेने मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीनंतर धक्कादायक ...

The notice of the Human Rights Commission was slammed ... | मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीचा ठामपाला दणका...

मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीचा ठामपाला दणका...

Next

ठाणे : कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ठाणे महापालिकेने मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीनंतर धक्कादायक खुलासा केला आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ६१ जणांच्या मृत्यूची नोंद केली नव्हती. यासंदर्भात तक्रार आल्यानंतरही नोंद का केली नाही, याबाबत महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने ठामपाला नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते. या नोटिसीनंतर शनिवारी पालिका प्रशासनाने ६१ जणांचे मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाल्याची कबुली दिली आहे.

महापालिकेच्या या खुलाशानंतर आतापर्यंत मृत्यूची ही आकडेवारी का लपविण्यात आली? ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी आयोगाची नोटीस येण्याची वाट का बघावी लागली? तसेच ठाणे महापालिकेकडे दररोज मृतांची नोंद घेतली जात नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ठाण्यात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असल्याने मार्चमध्ये असलेला मृत्यूचा दर हा एप्रिल महिन्यात चौपट झाला आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक कमी म्हणजे ०.३४ मृत्यूचा दर नोंदवला गेला. या महिन्यात केवळ ५० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, एप्रिल महिन्यात केवळ २२ दिवसांमध्ये १४८ ठाणेकरांचा या महामारीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील मृत्युदर हा १.३० वर झेपावला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मृत्यूची टक्केवारीदेखील वाढली आहे. दररोज स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पालिका प्रशासन जाहीर करीत असलेली मृत्यूची आकडेवारी आणि प्रत्यक्षात तीन स्मशानभूमीमध्ये नोंद केलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे .

ठाणे महापालिका हद्दीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येबाबत संभ्रम निर्माण झाल्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून यासंदर्भात महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीमध्ये ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याचे त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयोगाने ठाणे महापालिकेला यासंदर्भात १९ एप्रिल रोजी नोटीस पाठवून तीन आठवड्यांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शनिवारी पालिकेने आपल्या डॅशबोर्डमध्ये आतापर्यंत नोंद न झालेल्या ६१ जणांचा मृत्यू हा खासगी हॉस्पिटलमध्ये झाला असल्याचे सांगत खासगी हॉस्पिटलकडून प्राप्त झालेल्या ६१ मृत्यूचे पुनर्नयोजन केले असल्याचे पालिका प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले.

Web Title: The notice of the Human Rights Commission was slammed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.