‘सोलर कम्फर्ट’ला बजावली नोटीस, स्फोट झाल्याने कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:10 AM2020-09-01T02:10:02+5:302020-09-01T02:10:40+5:30
यासंदर्भात कंपनीच्या नजीक राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, आम्हाला या कंपनीचा त्रास होत आहे. यापूर्वी आम्ही कंपनीविरोधात तक्रारी दिल्या आहेत.
कल्याण : चक्कीनाका येथील भरवस्तीतील सोलर केम्फर्ट कंपनीत रविवारी दुपारी ४ वाजता स्फोट झाला. यावेळी मोठा आवाज होऊन धूर निघाल्याने तेथील रहिवासी भयभीत झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
यासंदर्भात कंपनीच्या नजीक राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, आम्हाला या कंपनीचा त्रास होत आहे. यापूर्वी आम्ही कंपनीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. चक्कीनाका परिसरातील रासायनिक कंपन्यांतून निघणाºया रासायनिक पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नसल्याने मागच्या वर्षी विहिरीत गुदमरून तीन नागरिक व दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. तर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारत सोनावणे यांनी कंपनीच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनीही कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगितले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयाने रविवारीच अधिकारी पाठवून कंपनीची पाहणी केली होती. कंपनीत गंधकाची पावडर तयार केली जाते. गंधकाचे मोठे तुकडे एका क्रश मशीनमध्ये टाकून त्याची पावडर करताना एखादा मोठा खडा अडकला तर, त्याचा स्फोट होतो. सुरक्षिततेची उपाययोजना केलेली नसल्याने कंपनीला उत्पादन न करण्याची नोटीस बजावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडेच सोनारपाडा येथील ड्रीमलॅण्ड कंपनीला आग लागली होती. सुरक्षिततेची उपाययोजना न केल्याने या कंपनीलाही उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपनीच्या आगीपूर्वी डोंबिवलीतील फेज-२ मधील अंबर केमिकल्स कंपनीत भीषण स्फोट झाला होता.
यापूर्वी ३२ कंपन्यांवर कारवाई
डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्याचे लेखापरीक्षण करीत नाहीत. असे परीक्षण न करणाºया ३२ कंपन्या बंद करण्याची कारवाई यापूर्वी करण्यात आली आहे. तसेच औद्योगिक सुरक्षेचे नियम न पाळणाºया १९ कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रशासनाने दिली आहे.