उल्हास नदी प्रदूषणाविरोधातील आंदोलनाची दखल घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:04+5:302021-02-23T05:00:04+5:30
कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेतर्फे १२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ...
कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेतर्फे १२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घ्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
कल्याणच्या पत्रीपुलासाठी पर्यावरणमंत्री ठाकरे हे कल्याणमध्ये दोनदा येऊन गेले. नदी प्रदूषणाचा विषय हा त्याच्या खात्यांतर्गत येतो. तसेच तो नागरिकांच्या जीवाशी निगडित आहे. त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे ठाकरे यांनी लक्ष द्यावे. कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे सरकारचे लक्ष नाही. येथील नागरिकांवर सरकारची कृपादृष्टी कधी होईल, हे आम्ही पाहतो असे पाटील म्हणाले.
मनसेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांच्या डोंबिवली पश्चिमेतील प्रभागातील विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील विषय उपस्थित केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमेतील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही पाटील यांच्या हस्ते झाले.
दोन्ही आमदारांनी चालविली सायकल
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे व भाजपची युती होणार का अशी चर्चा आहे, याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार पाटील व भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी रविवारी सायंकाळी एका जीमचे उद्घाटन केले. त्यावेळी दोन्ही आमदारांनी जीममधील सायकल चालविली. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. यापूर्वीही हे दोन्ही आमदार काही कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याविषयी पाटील यांना छेडले असता निवडणुकीच्या वेळी पाहू, असे सांगून मनसे-भाजप युतीची केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट केले.
----------------