कोरोनाकाळात रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:35+5:302021-07-30T04:41:35+5:30
ठाणे : कोरोनाकाळात अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांना अवाच्यासव्वा बिले आकारली होती. त्या बिलांची वसुली करण्यासाठी महापालिकेने समिती नेमली होती. ...
ठाणे : कोरोनाकाळात अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांना अवाच्यासव्वा बिले आकारली होती. त्या बिलांची वसुली करण्यासाठी महापालिकेने समिती नेमली होती. त्यानंतर अशा रुग्णालयांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही बहुतांश रुग्णालयांकडून अद्यापही ही रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेली नाही. यासंदर्भात मनसेने पुन्हा महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने ज्या रुग्णालयांनी रुग्णांकडून वाढीव रक्कम वसूल केली आहे, त्या रुग्णालयांना पुन्हा नोटीस बजावल्या असून ही रक्कम भरली गेली नाही, तर त्या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येणार नसल्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाकाळात खासगी रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली होती. उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता. रुग्णालय प्रशासनाचा बिलाबाबतचा गलथानपणा रोखा, अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाची भेट घेत केली होती. त्यानुसार तत्काळ पालिका प्रशासनाने कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी ८ कनिष्ठ लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार रुग्णालय प्रशासनाने बिल दिले का, याचे या टीमने परीक्षण केले. मात्र याप्रश्नी पुन्हा एकदा पाचंगे यांनी ठाणे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर यांची भेट घेतली. यावेळी अवाजवी बिलांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने सादर केलेल्या माहितीत धक्कादायक आकडे समोर आले. . मनसेच्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागाने २८ जुलैला सर्व रूग्णालयांनी बिलाची अतिरिक्त रक्कम परत द्यावी याकरिता नोटीस दिल्या आहेत. आतापर्यंत १ कोटी १४ लाख २८ हजार १२३ रुपये इतकी अवाजवी बिलांची रक्कम रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना दिलेली नसल्याचे उघड झाले आहे.
चौकट -
रुग्णांकडून लुबाडण्यात आलेली अवाजवी रक्कम परत करावी यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने २८ जुलै रोजी या रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे ही रक्कम परत दिली नाही तर रुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे.
लुबाडलेले पैसे परत करा
कोरोना रूग्णांचे लुबाडलेले पैसे त्यांना खासगी रूग्णालयांकडून मिळालेच पाहिजेत, अन्यथा मनसेच्या दणक्याला तोंड द्या.
- संदीप पाचंगे, विभाग अध्यक्ष,
मनसे, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ