शौचालय न उभारता जाहिरात करणाऱ्या ठेकेदाराला ८४ लाखांची दंडाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:21+5:302021-07-29T04:39:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात पाच ठिकाणी पीपीपी तत्त्वावर वातानुकूलित शौचालये उभी न करता जाहिरातीचा लाभ पदरात पाडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात पाच ठिकाणी पीपीपी तत्त्वावर वातानुकूलित शौचालये उभी न करता जाहिरातीचा लाभ पदरात पाडून घेणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात अखेर महापालिका प्रशासनाने ८४ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली.
एकूण १४ ठिकाणी शौचालये उभारून जाहिरातीचे हक्क मिळवणे अपेक्षित होते. नऊ ठिकाणी शौचालय उभारून ठेकेदाराने जाहिरातीचे हक्क प्राप्त केले. मात्र, पाच ठिकाणी शौचालय उभारलेच नाही.
काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत तसेच महासभेत शौचालयांवर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकावरून चांगलाच वादंग निर्माण झाला होता. शौचालये उभारण्यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला होता. त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करावी, त्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी केली होती. बाळकूम आणि मानपाडा परिसरात संबंधित ठेकेदाराकडून शौचालयांचे काम पूर्ण होण्याआधीच या ठिकाणी जाहिरातीचे फलक उभारण्यात आले.
........
असा होता प्रस्ताव
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात १४ ठिकाणी वातानुकूलित शौचालय बांधण्यात येणार होते. यामध्ये बाळकूम, वसंतविहार, मानपाडा, सिनेवंडर, कोपरी या भागाचा समावेश होता. वातानुकूलित शौचालय बांधून झाल्यावर शौचालयाच्या वरील बाजूस जाहिरातीचे फलक लावण्याचे अधिकार देण्यात आले होते. बाळकूम आणि मानपाडा परिसरात शौचालयाचे काम पूर्ण झाले नसताना माउंटिंग बांधून त्यावर जाहिरात फलक आधीच उभारण्यात आला. १४ ठिकाणांपैकी ५ ठिकाणी असे प्रकार झाले असल्याने ठेकेदाराला ८४ लाखांच्या दंडाची नोटीस बजावली.
.............