मलंगरोड ते उल्हासनगर रस्त्यासाठी बाधितांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:16+5:302021-01-22T04:36:16+5:30
कल्याण : पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे प्रस्तावित असून, केडीएमसीने त्यासाठी रस्तेबाधितांना नोटिसा ...
कल्याण : पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे प्रस्तावित असून, केडीएमसीने त्यासाठी रस्तेबाधितांना नोटिसा दिल्या आहेत. मात्र, केडीएमसीच्या या कारवाईस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रकाश तरे यांनी अधिकाऱ्यांची गुरुवारी भेट घेतली. मात्र, त्यावर प्रशासनाने ठोस उत्तर दिलेले नाही. या रस्त्यात बाधित होणाऱ्या जयंती चौधरी यांच्यासह अन्य काही जणांना प्रशासनाने ११ जानेवारीला नोटीस बजावली आहे. प्रस्तावित रस्ता हा विकास आराखड्यानुसार होणार आहे. त्याचा ठराव मनपाच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर प्रकल्पबाधितांना मनपाने यापूर्वीही नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रकल्पबाधितांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. डिसेंबरमध्येही नोटिसा बजावल्या होत्या. रस्तेबाधितांनी त्यांचे बांधकाम स्वत:हून काढून घ्यावे अन्यथा त्याविरोधात मनपाचे पथक कारवाई करेल, असे नोटिशीत प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या रस्तेबाधितांना न्याय देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी तरे यांनी मनपा प्रशासनाकडे केली. मात्र प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------