कल्याणमधील थायरोकेअर लॅबला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:51 PM2020-06-12T23:51:57+5:302020-06-12T23:52:01+5:30

कोरोना चाचणीचा अहवाल चुकीचा : केडीएमसीने मागवला खुलासा

Notice to Thyrocare Lab in Kalyan | कल्याणमधील थायरोकेअर लॅबला नोटीस

कल्याणमधील थायरोकेअर लॅबला नोटीस

Next

कल्याण : पश्चिमेकडे असणाऱ्या थायरोकेअर लॅबने कोरोना चाचणीचा चुकीचा अहवाल दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास झालेल्या एका व्यक्तीने लॅबविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. चुकीचा अहवाल देणाºया या लॅबला प्रशासनाने नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. दरम्यान, लॅबमार्फत केली जाणारी चाचणी आणि त्याच्या अहवालाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहाड येथे राहणारे शरद पाटील यांच्या हाताला दुखापत झाली होती. रुग्णालयात गेले असता त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरने दिला. सरकारच्या नव्या नियमानुसार कोविड चाचणी करणे आवश्यक असल्याने त्यांनी थायरोकेअर येथे चाचणी केली. त्याचा अहवाल येण्यापूर्वी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल लॅबने दिला. त्यांना तातडीने महापालिकेने अधिग्रहित केलेल्या होलिक्रॉस रुग्णालयात दाखल केले. काहीही लक्षणे नसताना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना व त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांना उपचार घ्यावे लागतील, असे सांगण्यात आले. मात्र, पाटील यांनी शंका तपासून पाहण्यासाठी मेट्रोपोलीस लॅबमध्ये पुन्हा कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्याने पाटील कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यानच्या काळात मात्र त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या पत्नीसह घरातील चार जणांना क्वारंटाइन व्हावे लागले. इमारत सील करण्यात आली. अनेकांच्या हातांवर शिक्के मारण्यात आले. होलिक्रॉस रुग्णालयात स्वतंत्र रूमसाठी २० हजार मोजावे लागले. पैसे होते म्हणून ही चाचणी करता आली. यावरून प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे कट प्रॅक्टिस जोरात सुरू आहे. चुकीचा अहवाल देणाºया लॅबवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित करून पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. पालिकेने या लॅबला नोटीस बजावून पुन्हा असा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या लॅबकडून दररोज महापालिकेला कोरोनाचे पाच अहवाल दिले जातात. त्यामुळे दोन महिन्यांत असे किती अहवाल चुकीचे दिले आहेत, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य खात्यातील साथरोग नियंत्रक प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी लॅबला नोटीस बजावली आहे. कोरोना चाचणी करण्याचे काम थांबवण्यास सांगितलेले नाही, असे सांगितले.

संशयाला बळकटी; आरोपांमध्ये तथ्य?
लॅबमध्ये गेल्यावर उपचार कुठे घेणार, अशी विचारणा केली जाते. पालिका रुग्णालयात उपचार घेणार असल्याचे सांगितल्यास अहवाल निगेटिव्ह, तर खाजगी रुग्णालयात सांगितल्यास पॉझिटिव्ह अहवाल दिला जातो, असा संशय यापूर्वी अनेकांनी व्यक्त केला होता. थायरोकेअरच्या चुकीच्या अहवालानंतर या प्रकारचे उद्योग लॅबचालकांकडून केले जात असावेत, या आरोपात तथ्य असल्याचे उघड
झाले आहे.

Web Title: Notice to Thyrocare Lab in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.