सोसायट्यांची पुन्हा करणार कचराकोंडी; ४२५ सोसायट्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 02:08 AM2019-12-14T02:08:30+5:302019-12-14T02:08:56+5:30
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे.
ठाणे : प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तकचऱ्याची निर्मिती करणाऱ्या, तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. मागील वर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षभर लांबणीवर पडला होता. मात्र, आता पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषगांने कचरा विल्हेवाटीचे हत्यार पुन्हा बाहेर काढले आहे. यानुसार येत्या १५ दिवसांत तत्काळ कचरा विल्हेवाटीचा प्रश्न या सोसायट्यांनी मार्गी लावावा अन्यथा त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा इशाराच नोटिसींद्वारे दिला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात दोन वर्षापूर्वी एक आध्यादेश काढून ज्या सोसायटी अथवा आस्थापनांकडून प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त कचरा निर्मिती होते.
तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. यानुसार ठाणे महापालिकेने सर्व्हे करून तब्बल ४२५ हून अधिक सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा विषय गाजला होता. त्यावेळेस महासभेतही यावर सदस्यानी आवाज उठविला होता. त्यानंतर सोसायटीधारकांना ऑक्टोबरपर्यंतची मुदतही दिली होती. परंतु, त्यावेळेस झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण बासणात गुंडाळण्यात आले होते.
या मोहिमांचे काय झाले?
मध्यतंरी कचºयाची विल्हेवाट न लावल्यास पालिकेने संबधींताविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही सांगितले होते. तसेच शुन्य कचरा मोहीम सुू केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. शिवाय ज्या सोसायटी कचºयाची विल्हेवाट लावून खत तयार करतील त्यांच्या खताचे ब्रँडिंग करून बाजार उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. परंतु, या मोहिमा कागदापलिकडे पुढे सरकलेल्या नाहीत.
१५ दिवसांची मुदत
आता वर्षभरानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने पुन्हा हे हत्यार बाहेर काढले असून अशा सोसायटी आणि इतर आस्थापनांना नोटीस बजावण्याची मोहीम सुरू केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या १५ दिवसांत या आस्थापनांनी कचºयाची विल्हेवाट लावली नाही तर त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा तातडीचा इशारा यामध्ये दिला आहे.