उल्हासनगरात रेल्वेच्या विजेच्या लाईन खालील बांधकामांना नोटिसा
By सदानंद नाईक | Published: October 14, 2022 03:54 PM2022-10-14T15:54:30+5:302022-10-14T15:56:35+5:30
उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले.
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या समांतर गेलेली रेल्वेची उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली अवैध बांधकामे झाल्याने, अपघाताची शक्यता निर्माण झाली. रेल्वे याबाबत महापालिकेला पत्र दिल्यावर अशा बांधकामाना अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी नोटिसा देऊन बांधकामे काढून घेण्यास बजावले आहे.
उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले. त्यापैकी २०० बांधकामे पूर्णतः बाधित झाले असून त्यांनी पर्यायी जागा मागितली आहे. तर अंशतः बाधित झालेल्या दुकानदारांनी बहुमजली बांधकामे केली. रस्त्याच्या समांतर रेल्वेची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असून रुंदीकरणाच्या नावाखाली विधुत वाहिनी गेली, त्याखाली उंच बांधकामे केली. या बांधकामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त करून बांधकामाबाबत महापालिका अतिक्रमण विभागाला कारवाईचे पत्र पाठविले. महापालिका अतिक्रमण पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशनुसार नोटसा देऊन बांधकामे स्वतःहून काढण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या नोटीसीने दुकानदारांत खळबळ उडाली आहे.
रस्ता रुंदीकरणात दुकानाची जागा गेली असून पुन्हा महापालिकेने नोटिसा पाठविल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. बांधकामे व विद्युत वाहिनी यामध्ये अंतर असून अपघात होण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी आतापर्यंत १० दुकानदारांना बांधकामे स्वतःहून काढण्याच्या नोटिसा दिल्या असून रेल्वे विद्युत वाहिनी खालील सर्वच दुकानदारांना नोटिसा देणार असल्याचे संकेत दिले. रुंदीकरणात ज्यांचे दुकाने बाधित झाली. त्यांनी बहुमजली बांधकामे कोणतीही बांधकाम परवाने न घेता बांधण्यात आले. या बांधकामाला अवैध असल्याचे ठरवून दुप्पट मालमत्ता कर बिले देण्यात आले असे दुकानदारांचे म्हणणे आहे. नोटिसा दिलेल्या दुकानदारांनी स्वतःहून बांधकामे काढली नाहीतर, त्यावर पाडकाम कारवाईचा इशारा शिंपी यांनी दिला आहे.
शांतीप्रकाश शाळा रस्ता रुंदीकरणाची बांधकामाची चर्चा
कॅम्प नं-५ वसंतबहार शांतीप्रकाश शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बहुमजली विना बांधकामे उभी राहिली असून महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप सर्वच स्तरातून होत आहे.