टँकरचालकांना बजावल्या नोटिसा; पाणीचोरीमुळे कामवरी नदी कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:19 AM2019-06-01T00:19:29+5:302019-06-01T00:19:48+5:30
लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत.
रोहिदास पाटील
अनगाव : ‘भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी’ असे वृत्त मंगळवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव यांनी घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत पाणीटंचाईसह दुरवस्था झालेल्या बंधाºयाची पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. नदी कोरडी पडलेली असताना पाणीचोरी सुरूच आहे. याबाबत ग्रामपंचायतीने टँकरमालकांना नोटिसा बजावल्या असल्याचेही जाधव यांनी सांगितले. डाइंग कंपनीला टँकरमधून पाणीपुरवठा होतो.
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल आमदार शांताराम मोरे यांनी घेतली. त्यांनी ग्रामसेवक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरही पाणीटंचाई दूर झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. जेव्हा बंधाºयाचे काम सुरू होते, तेव्हा अधिकाºयांनी उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, येथील अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयाची दुरवस्था झाली. बंधारे वाहून गेल्याने पाणी साठून राहत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी संबंधित अधिकाºयांना अहवाल सादर करण्याची सूचना दिली असून नदीपात्राचे खोदकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शेलार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांची सभा घेऊन पाणीचोरांना नोटिसा बजावल्या.
गाळ काढल्यास उन्हाळ्यात फायदा होईल
कामवरी नदीतील गाळ काढल्यास पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नदीच्या पाण्याचा उन्हाळ्यात शेतकºयांना भाजीपाला, जनावरांना, नागरिकांना उपयोग होईल. याकरिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनलाल सोनवणे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
अजूनही टंचाई भेडसावत आहे
जून महिना उजाडला, तरी नागरिकांना खड्ड्यांतील दूषित पाणी व हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. अधिकारी सांगतात, पाणीटंचाई दूर झाली, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी दौरा करतील का? अधिकाºयांनी कागदोपत्री दाखवलेल्या पाणीटंचाई दूर झाल्यावर विश्वास ठेवणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.