नवरात्रोत्सवाच्या ६१ मंडळांना ठाणे महापालिकेच्या नोटिसा
By admin | Published: October 27, 2015 12:21 AM2015-10-27T00:21:39+5:302015-10-27T00:21:39+5:30
परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.
ठाणे : परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. परंतु, ही मंडळे दंड भरणार का, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आधीच १३१ गणेशोत्सव मंडळांनी त्यांना ठोठावलेला १ लाखांचा दंड अद्याप भरलेला नसताना आता पुन्हा नवरात्रोत्सव मंडळांना दंड ठोठावला आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री दुष्काळ निधी फंडात हा निधी जमा करून त्याची पोचपावती पालिकेकडे आणायची, असे सांगून पालिकेने यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी पालिकेची आहे. त्यानुसार, पालिकेशी पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्यापही एकाही मंडळाने दंड भरलेला नाही.
दरम्यान, असे असताना आधीच गणेशोत्सव मंडळांनी ठाणे महापालिकेचे नियम पायदळी तुडविले असतानादेखील
आता नवरात्रोत्सव मंडळांवरही पालिकेने लुटूपुटू कारवाईचा दंडुका उगारला आहे.
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेने रस्त्यावर मंडप उभारणाऱ्या मंडपांना चपराक लगावण्यास सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अशाच प्रकारे रस्त्यावर मंडप उभारून किंबहुना रस्ता अडविणाऱ्या १३१ मंडळांना पालिकेने १ लाख रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या.
पाचपाखाडी, टेंभीनाका, मानपाडा अशा विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाचे मंडप रस्त्याच्या मध्यभागी टाकले होते. यामुळे ठाणेकरांना त्याचा त्रास झाला. अनेक ठाणेकरांनी याबद्दल पालिका प्रशासनाकडे तक्र ारीही केल्या होत्या.