उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा
By सदानंद नाईक | Published: February 23, 2024 06:02 PM2024-02-23T18:02:40+5:302024-02-23T18:03:47+5:30
उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही.
उल्हासनगर : शहरातील १५० कोटीच्या निधीतील मुख्य ७ रस्त्यांचे बांधकामाबाबत आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत बैठक घेऊन येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नेताजी ते भाटीया चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणांचा आड ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्या असून आमदार किणीकर यांनी रस्त्याची पाहणी केली.
उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही. या रस्त्याच्या पाठोपाठ भुयारी गटारीसाठी रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड सुरू झाली. याधर्तीवर आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह विभागप्रमुख अधिकाऱ्यांची गुरवारी बैठक घेऊन रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मुख्य ७ रस्त्या पैकी कैलास कॉलनी ते नेताजी चौक दरम्यानच्या नेताजी ते भाटीया चौक मधील ५४ दुकानदारांना रस्ता रुंदीकरणासाठी नोटिसा दिल्याची माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे.
महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्यावर त्यांनी राजकीय नेते व महापालिकेकडे धाव घेतली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी बाधित दुकानदारांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच रस्त्यांच्या आड येणारी बांधकामे हटविणे, धुळीचे प्रदुषण टाकण्यासाठी पाण्याचा वावर करणे, बांधकाम ठिकाणी हिरव्या कपड्याचा वापर करणे, झाडे विद्युत खांब व ट्रांसफार्मर इतर ठिकाणी स्थलांतरित करणे, ड्रेनेज व जलवाहिनीची कामे वेळेत पूर्ण करणे, रस्त्यावर खोदकाम करतांना निघालेल्या मातीचे ढिगारे त्वरित हटविणे आदीचे आदेशही काढण्याची मागणी आयुक्तांना आमदार किणीकर यांनी केली.
आयुक्तांच्या आदेशाची वाट
आमदार बालाजी किणीकर यांनी घेतलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, नगररचनाकार सहायक संचालक ललित खाब्रागडे, शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे आदीजन उपस्थित होते. मात्र आमदारांनी सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी साठी आयुक्त कधी आदेश काढतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.