ठेकेदारा कडून पाण्याचे मीटर लावून घेण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या व्यावसायिकांना नोटिसा

By धीरज परब | Published: April 13, 2023 06:35 PM2023-04-13T18:35:01+5:302023-04-13T18:35:22+5:30

ठेकेदारा कडून मीटर न लावल्यास नळ जोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे

Notices to Mira Bhayander Municipal Corporation professionals to install water meters from contractors | ठेकेदारा कडून पाण्याचे मीटर लावून घेण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या व्यावसायिकांना नोटिसा

ठेकेदारा कडून पाण्याचे मीटर लावून घेण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या व्यावसायिकांना नोटिसा

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील व्यावसायिकांना नोटिसा पाठवून पाण्याचे अल्ट्रासॉनिक मीटर पैसे भरून लावून घेण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत . शिवाय ५ वर्ष ठेकेदारास देखभालीचे पैसे सुद्धा द्यावे लागणार आहेत . ठेकेदारा कडून मीटर न लावल्यास नळ जोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे . तर पालिकेने निश्चित केलेल्या दरा नुसार २९२८ मीटर बसवण्यासाठी ठेकेदारास ४ कोटी ९० लाख मीटर विक्रीचे तर ५ वर्षाच्या देखभालीसाठी २ कोटी १८ लाख ६३ हजार मिळणार आहेत . 

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहरातील वाणिज्य वापराच्या अनिवासी नळ जोडण्या घेतलेल्याना नवीन एनबी - एलोटी तंत्रज्ञानावर आधारित अल्ट्रासॉनिक मीटर बसवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.  पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांच्या नावाने ह्या नोटीस बजावण्यात आल्या असून त्यात तत्कालीन महासभा व स्थायी समितीने मंजुरी दिल्याचा संदर्भ दिला आहे . 

१५ एमएम जोडणीच्या मीटर साठी १५ हजार २४८ रुपये पासून किंमत टप्प्या टप्प्याने वाढते . कमाल ५० एमएम वाहिनीच्या मीटर साठी ४० हजार ८५० रुपये भरायचे आहेत . जलवाहिनीच्या आकारा प्रमाणे मीटर शुल्काचा तक्ताच पालिकेने नोटीस मध्ये दिला आहे . पालिकेच्या कनकिया येथील विलासराव देशमुख भवन मध्ये मीटर विक्री केंद्राची व्यवस्था पालिकेने केली आहे . 

या शिवाय ५ वर्षाचे मीटर देखभाल शुल्क सुद्धा निश्चित करण्यात आले असून १ हजार ८३ रु . पहिल्या वर्षा साठी तर दरवर्षी त्यात वाढ होऊन पाचव्या वर्षी १ हजार ८८१ रुपये पर्यंत शुल्क भरावे लागणार आहे . सदर मीटर खरेदीचे रुपये  व देखभाल साठीचे शुल्क हे मे . एकॉर्ड  वॉटरटेक अँड इन्फ्रा ली . ह्या ठेकेदाराला द्यायचे आहेत.  ठेकेदाराचा क्रमांक नोटीस मध्ये देण्यात आला आहे .  १० दिवसात नवीन मीटर लावून न घेतल्यास नळ जोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे . 

महापालिकेच्या ९ जुलै २०२१ च्या सभेत स्थायी समितीत तत्कालीन भाजपाचे सभापती दिनेश जैन यांच्या कार्यकाळात निविदा मंजुरीचा निर्णय सर्वानुमते  घेण्यात आला होता .  भाजपाचे राकेश शाह यांनी मांडलेल्या ठरावास हसमुख गेहलोत यांनी अनुमोदन दिले होते . स्थायी समितीने २ हजार ९२८ वाणिज्य नळ जोडणीला मे. अकॉर्ड वॉटरटेक ॲन्ड इन्फ्रा प्रा.लि. या संस्थे कडून नवीन मीटर लावून घेण्याच्या निविदेस मंजुरी दिली होती . शिवाय शहरातील नव्याने निवासी वा वाणिज्य नळ जोडणी घेणाऱ्यांना सदर मीटर बंधनकारक करावे . तसेच जुन्या निवासी नळजोडणी धारक नागरिकांना ह्या मीटरचा वापर करण्याचे आवाहन करावे असा ठराव केला होता . 

शरद नानेगावकर ( कार्यकारी अभियंता , पाणीपुरवठा विभाग ) - तत्कालीन महासभा व स्थायीसमितीने मंजुरी दिल्या नुसार नवीन डिजिटल मीटर बसवण्याचे व देखभालीचे कंत्राट पालिकेने दिले आहे . तसा शासन निर्णय आपल्या निदर्शनास आलेला नाही . नवीन मीटर मुळे मीटर रिडींग घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाण्याची गरज लागणार नाही व कार्यालयात बसल्या बसल्या पाण्याची रिडींग मिळून बिले काढली जातील . 

राजेंद्र मित्तल ( अध्यक्ष - श्री भाईंदर स्टेनलेस स्टील मॅन्युफ्रेक्चरर व ट्रेडर्स असोसिएशन ) - ठेकेदारा कडून मीटर बसवणे व देखभाल शुल्क सक्ती सहन केली जाणार नाही . आधीच पालिकेने पाणी पट्टी पासून करवाढ केली असून नवीन कर लावले आहेत . या विरोधात उद्योजक आणि व्यावसायिक संघटनांची सोमवारी बैठक होणार आहे . 

दीपक शाह ( माजी अध्यक्ष - स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ) - सध्याचे पाणी मीटर हे शासन मान्यता प्राप्त असताना ठेकेदारा कडूनच ठराविक मीटर खरेदी आणि ५ वर्षांचे देखभाल शुल्क देण्याची सक्ती अन्यायकारक आहे . शासनाचा असा कोणताच निर्णय नसून महापालिका अधिनियमात तशी तरतूद नसताना ठेकेदाराच्या बक्कळ फायदा करून देण्यासाठी लहान उद्योजकांची लूट योग्य नाही . 

Web Title: Notices to Mira Bhayander Municipal Corporation professionals to install water meters from contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.