ठाण्यातील वृद्धेची सोनसाखळी खेचून पळालेला चोरटा अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:19 PM2019-10-03T23:19:48+5:302019-10-03T23:24:31+5:30
नौपाडा भागात पुन्हा सोनसाखळी चोरटयांनी डोके वर काढले असतांनाच एका वृद्धेची सोनसाखळी खेचून पळालेल्या अजुद्दीन सिराज शेख (३७) या सराईत चोरट्याला नौपाडा पोलिसांनी वांगणी येथून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून जबरी चोरीतील सुमारे २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळीसह एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वृद्धेची सोनसाखळी खेचून पळालेल्या अजुद्दीन सिराज शेख (३७) या सराईत चोरट्याला नौपाडा पोलिसांनी वांगणी (ता. अंबरनाथ) येथून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून जबरी चोरीतील सुमारे २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि एक मोटारसायकल असा एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाण्याच्या चरई परिसरात राहणारी संबंधित ७२ वर्षीय तक्रारदार महिला ही ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी नातवास क्लासवरून घेऊन येत होती. त्यावेळी चरईतील ‘संदीप अपार्टमेंट’समोरील रस्त्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केला होता. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोनसाखळीची जबरी चोरी करणाऱ्यांपैकी मोटारसायकलचा चालक अजुद्दीन याला २९ सप्टेंबर २०१९ रोजी वांगणी परिसरातून ताब्यात घेतले. सोनसाखळी जबरी चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली. त्याला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
*साथीदाराचा शोध सुरू
जबरी चोरीतील ८० हजारांची सोनसाखळी आणि त्या चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एक लाख २० हजारांचा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. त्याच्या फरारी साथीदाराचाही शोध घेण्यात येत असून त्याने आणखी कोणत्या परिसरात असे सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे केले, याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली.