कुख्यात गँगस्टर छोटा शकीलच्या बहिणीचा मुंब्य्रात मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 08:44 PM2020-06-16T20:44:36+5:302020-06-16T20:51:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा हस्तक गँगस्टर महंमद शकील बाबुमियाँ शेख उर्फ छोटा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा हस्तक गँगस्टर महंमद शकील बाबुमियाँ शेख उर्फ छोटा शकील याची बहिण हमीदा फारुख सय्यद (५०, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) हिचा सोमवारी रात्री मृत्यु झाला. तिच्या मागे पती फारुख एक अविवाहित मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
अमृतनगरच्या शादीमहल रोडवरील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर सय्यद कुटूंबीय वास्तव्याला आहे. हमीदाला गेल्या दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता. सोमवारी तिला हा त्रास अधिक प्रमाणात जाणवला. त्यानंतर ह्दयविकाकाराने १५ जून रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तिचा घरातच मृत्यु झाला. तिच्या पार्थिवाला १६ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा, अमृतनगर येथील दर्गा रोडवरील कब्रस्थानात दफन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फारुख हा आजारी असल्यामुळे तो कोणताही कामधंदा करीत नाही. मुंब्रा येथे त्याचा एसटीडीचा टेलिफोन बूथ होता. अलिकडे तो नेरुळ येथे काही बांधकामे करीत होता. हमीदाला श्वसनाचा त्रास झाल्यामुळे तिचा मृत्युही कोरोनामुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यास कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तसेच तिची कोरोनाची तपासणीही झालेली नव्हती, अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
* १९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम कासकर याचा उजवा हात समजला जाणारा त्याचा खास हस्तक छोटा शकील याच्यावरही बॉम्ब स्फोटासह बडया व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणे, खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि ठार मारण्याची धमकी देणे असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षांपासून तो पाकिस्तानातील कराची तसेच इतर वेगवेगळया देशांमध्ये वास्तव्याला असल्याचे बोलले जाते.
* छोटा शकीलची मीरा रोड येथे राहणारी लहान बहिण फहमिदा हिच्या मृत्यूला महिना उलटण्यापूर्वीच आता मोठी बहिण हमीदा हिचाही मृत्यु झाला आहे. छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा ही दुसऱ्या क्रमांकाची बहिण होती.