अभिनेता राकेश रोशन याच्यावरील गोळीबारासह ११ खून आणि सात खूनाच्या प्रयत्नातील कुख्यात गँगस्टर जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: October 9, 2020 10:13 PM2020-10-09T22:13:08+5:302020-10-09T22:24:51+5:30
अभिनेता राकेश रोशन यांच्यावरील गोळीबारासह तब्बल ११ खून आणि सात खूनाच्या प्रयत्नातील गँगस्टर सुनिल विश्वनाथ गायकवाड या शार्प शूटरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो पसार झाला होता.
जितेेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अभिनेता राकेश रोशन याच्यावरील गोळीबारासह तब्बल ११ खून आणि सात खूनाच्या प्रयत्नातील गँगस्टर सुनिल विश्वनाथ गायकवाड या शार्प शूटरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला मुंबईच्या पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुन्हेगार सुनिल गायकवाड याच्यावर खूनाचे अनेक गुन्हे नोंद असून तो ठाण्याच्या कळवा पारसिक सर्कल परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मध्यवर्ती शोध पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उपायुक्त दीपक देवराज आणि सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने सुनिल याला पारसिक सर्कल भागातून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
अशी आहे सुनिलची गुन्हेगारी पार्श्वभूमी
अलिबद्रेश, सुभाष सिंग ठाकूर याच्या टोळीमध्ये तो कार्यरत असतांना १९९९ ते २००० या वर्षांमध्ये तब्बल ११ खून आणि सात खूनाचे प्रयत्नाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकार राकेश रोशन यांच्यावरील गोळीबारातही त्याचा सहभाग होता. एका खूनाच्या गुन्हयात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना २६ जून २०२० रोजी २८ दिवसांच्या पॅरोलवर मुंबईतील घाटकोपर येथे तो आला होता. त्याची पॅरोल रजा संपल्यानंतर तो पुन्हा नाशिक कारागृहात परत न गेल्यामुळे नाशिक कारागृह प्रशासनाने याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात २२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे, उपनिरीक्षक शेलार, पोलीस हवालदार चिंतामण शिर्के, वाघमोडे आणि लोहार आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याला पंतनगर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.