यापुढे शिळी मिठाई विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:39 PM2020-10-01T23:39:14+5:302020-10-01T23:44:19+5:30
यापुढे मिठाई सेवनास योग्य असल्याचा कालावधी न टाकताच तिची विक्री करणाºया हलवायांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. केंद्र शासनाच्या अन्न व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मिठाई ‘फ्रेश’ आहे का? असा प्रश्न कोणत्याही हलवायाला ग्राहकांकडून हमखास विचारला जातो. यापुढे असा प्रश्न विचारण्याची गरज राहणार नाही. कारण ही मिठाई किती तारखेपर्यंत सेवन करता येईल, याची तारीखच टाकणे आता अन्न व औषध प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. तसे आढळले नाही तर संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाचे ठाण्याचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, सुटटया पद्धतीने मिठाईची विक्री करणाºया व्यावसायिकांना मिठाईच्या उत्पादनाची तारीख उल्लेख करणे हे ऐच्छिक राहणार आहे. परंतू, मिठाई खाण्यासाठीचा योग्य कालावधी (बेस्ट बिफोर डेट) तारखेचा उल्लेख करणे मात्र बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज १ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही मिष्टान्न विक्री करणाºया किंवा हलवाईच्या दुकानांमध्ये यापुढे पेढे, लाडू किंवा कोणताही तत्सम पदार्थ विक्रीसाठी ठेवलेल्या ट्रेवर, शोकेसवर तो कधीपर्यंत सेवन करता येईल, त्या तारखेचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक राहणार आहे. अनेक सण उत्सवांमध्ये मिठाई विक्रीच्या दुकानांबाहेर ती खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र असते. परंतू, सुट्ट्या पद्धतीने विक्र ी होणारी मिठाई कधी बनवली आणि ती कधीपर्यंत खाता येऊ शकते, याबाबतच्या तारखेचा कोणताही उल्लेख केलेला नसतो. त्यामुळेच अनेकदा शिळया मिठाईच्या विक्रीतून विषबाधेसारखे प्रकारही होऊन जीव धोक्यात सापडू शकतो. त्यामुळेच आता केंद्र शासनाच्या अन्न व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ती खाण्यासाठीचा योग्य कालावधी ठरवून तसे उल्लेख करणे बंधनकारक राहणार आहे. तसा उल्लेख न करणाºया मिठाई विक्रेत्यांची तपासणी करुन त्यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.
‘‘ एखाद्या मिठाई विक्रेत्याने त्याच्या मिठाईच्या उत्पादनाची तारीख टाकणे हे ऐच्छिक राहणार आहे. पण ते कधीपर्यंत सेवन करावे, याची तारीख प्रदर्शित करणे हे मात्र यापुढे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी अशा तारखांचा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’’
शिवाजी देसाई, सह आयुक्त, कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन,ठाणे