आता एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांकडूनही घेतले प्रतिज्ञापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:26 PM2022-07-30T16:26:49+5:302022-07-30T16:27:42+5:30
शिवसेनेवर पक्षीय वर्चस्व कोणाचे, हे दाखविण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ लागली आहे.
ठाणे : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर नेमका पक्ष कोणाचा? हा वाद निर्माण झाला आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे ठाण्यातील त्यांच्या समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. टेंभी नाका येथील आनंद आश्रमात हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या समर्थक शिवसैनिकांकडून अशी प्रतिज्ञापत्र लिहून देण्यात येत होती.
शिवसेनेवर पक्षीय वर्चस्व कोणाचे, हे दाखविण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ लागली आहे. ठाण्यातील शिंदे समर्थक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेससोबत केलेली आघाडी चुकीची होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या वेगळ्या गटाला आमचा पाठिंबा आहे, असे या प्रतिज्ञापत्रात लिहून घेतले जात आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे.