आता आगरी समाजालाच साकडे
By admin | Published: January 14, 2017 06:29 AM2017-01-14T06:29:40+5:302017-01-14T06:29:40+5:30
आपल्या मायमराठीचा जागर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी भाषेबद्दल प्रेम-आत्मीयता असणारे,
डोंबिवली : आपल्या मायमराठीचा जागर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी भाषेबद्दल प्रेम-आत्मीयता असणारे, साहित्यप्रेमी या संमेलनात सहभाही होणार आहेत. संमेलन मराठीजनांच्या मनात ठसावे, यासाठी आगरी युथ फोरमने आता आगरी समाजालाच साकडे घातले आहे.
आगरी युथ फोरमने त्यासाठी १४ जानेवारीला दुपारी ४ वाजता होरायझन सभागृह, मानपाडा रोड येथे बैठक बोलवली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फोरम २५ वर्षे कार्यरत आहे. ही संस्था १४ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवत आहे. आपल्या समाजाभिमुख विचाराचा आधार घेऊनच आगरी महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याने महोत्सव अधिक लोकाभिमुख झाला आहे. यामुळेच संस्थेला यंदाच्या वर्षी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. आगरी समाजाला साहित्य प्रांत नवा नाही. समाजातील मंडळींनी पारंपरिक गाणी, गोष्टींद्वारे या साहित्याची मौखिक जपणूक केली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्या मातृभाषेच्या साहित्य संस्कृतीच्या ऋणातून कणभर का होईना, उतराई होण्याची संधी संस्थेला मिळालेली आहे. हे केवळ संमेलन नव्हे, तर मायमराठीचा वैभवशाली महोत्सव आहे. समाजामध्ये वाचनसंस्कृतीला चालना मिळावी आणि लेखनिकता वाढावी, या हेतूने संमेलन भरवले जाते. आगरी समाजाच्या सहकार्याशिवाय हा शिवधनुष्य पेलता येणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, असे एक पत्रक काढण्यात आले आहे. (प्रतिनिधी)