आता शिवसेनेकडूनही एलईडी बल्बचे वाटप
By admin | Published: July 27, 2015 11:15 PM2015-07-27T23:15:46+5:302015-07-27T23:15:46+5:30
केंद्र आणि राज्य शासनाने सुरु केलेल्या उपक्रमाअंतर्गत महावितरणने भांडुप परिमंडळात एलईडी ब्लबचे वाटप सुरु केले आहे. परंतु त्यांनी ही मोहीम हाती घेण्याआधीच शहरात भाजपाने
ठाणे : केंद्र आणि राज्य शासनाने सुरु केलेल्या उपक्रमाअंतर्गत महावितरणने भांडुप परिमंडळात एलईडी ब्लबचे वाटप सुरु केले आहे. परंतु त्यांनी ही मोहीम हाती घेण्याआधीच शहरात भाजपाने याचे वाटप सुरु केले. त्यानंतर महावितरणने ही मोहीम रविवारपासून हाती घेतली आहे. परंतु आता राजकीय श्रेयासाठी आता शिवसेनाही पुढे आली असून त्यांनीसुध्दा शहरात एलईडी बल्बचे वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांना याचा एक प्रोग्रॅमच आखला असून शहरातील विविध भागात या संदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
जुलै महिन्याच्या सुरवातीला शहर भाजपाच्या वतीने एलईडी बल्बच्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानंतर रविवारी महावितरणने याचे वाटप सुरु केले आहे, त्यानुसार शहरात पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार बल्बचे वाटप करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. परंतु आता या बल्ब वाटपाच्या निमित्ताने ठाण्यात राजकीय वादळ पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपाने यात पहिली उडी घेऊन शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम हाती घेऊन या मोहीमेचा महावितरणने शुभारंभ करण्याआधीच नारळ फोडला. त्यानंतर महावितरण आणि आता शिवसेनेनेही या मोहीमेत उडी घेतली आहे. खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रत्येक प्रभागात दोन ते तीन कार्यक्र म राबविण्याचा आग्रह करून या
कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्र माला महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, लोकसभा जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. एकाच दिवशी शहरातील आठ ठिकाणी ही मोहीम हाती घेऊन त्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यात वाटले ५ हजार आता नवीमुंबईलाही वेध
महावितरणकडून भांडूप परिमंडळातील भांडुप, मुलुंड मंडळाअंतर्गत १ जुलै पासून आतापर्यंत ७६००० तर ठाणे मंडळात पाच हजार बल्बचे वाटप करण्यात आले आहे. तसेच नवीमुंबईत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले असून पुढील आठवड्यापर्यंत या भागात ही योजना सुरु करण्यात येणार आहे.