आता गुजराती नामफलकाचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:19 AM2018-12-20T05:19:19+5:302018-12-20T05:19:40+5:30
राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे
भार्इंदर : येथील प्रभाग क्रमांक-६ मधील नारायणनगर परिसरात पालिकेने गुजराती भाषेत चौकाचा नामफलक लावल्याने नवा वाद उफाळून आला आहे. हा नामफलक मराठीतच लावण्यात यावा, यासाठी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बामणे यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या गुजराती भाषेतील वीजबिलांवरून भार्इंदर येथे अलीकडेच मोठे वादंग झाले होते.
राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. परंतु, जो तो मराठी भाषेची गळचेपी करत असून परप्रांतीय भाषेचाच उदोउदो केला जात आहे. शहरात परप्रांतीयांचा सुळसुळाट वाढला असला, तरी मातृभाषेचा आदर करणे त्यांचे कर्तव्य आहे. याउलट, परप्रांतीय भाषेला शहरात ठिकठिकाणी जाणीवपूर्वक प्राधान्य दिले जात असून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार केला जात आहे. याकडे स्थानिक पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष होऊन ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखालील कारभारात व्यस्त झाल्याचा आरोप बामणे यांनी केला आहे. नजीकच्या काळात शहरात परप्रांतीय भाषेचा वाद उफाळून येत असताना पालिका व पोलीस त्याची दक्षता घेत नाहीत. त्याला राजकारणीच खतपाणी घालत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. अशाच राजकीय प्रेरणेने पालिकेने नारायणनगर परिसरात चक्क गुजराती भाषेत नामफलक लावला आहे. यापूर्वीसुद्धा पालिकेने दीडशे फूट मार्गावरील वंदन चौकात गुजराती भाषेमध्ये नामफलक बसवला होता. त्याला विरोध झाल्यानंतर गुजराती नामफलक काढून मराठी नामफलक लावण्यात आला. अलीकडेच अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने गुजराती भाषेतील वीजबिल वितरित केल्याने राजकीय गदारोळ झाला. मराठी भाषेच्या वापरासाठी चळवळ सुरू करणाºया मराठी एकीकरण समितीने सर्वप्रथम त्याविरोधात आवाज उठवला होता. आता मराठी भाषेच्या या गळचेपीत आणखी एक भर पडली आहे. भार्इंदर पश्चिमेकडील नारायणनगर येथे पालिकेने गुजराती नामफलक लावल्याचे समजताच युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बामणे यांनी नामफलक हटवण्याची मागणी आयुक्तांकडे केली.
मराठी भाषेच्या वापरात हयगय करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही अशा प्रकारे मराठी भाषेची गळचेपी स्थानिक प्रशासनाकडूनच सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मराठी भाषेचा अपमान केला आहे. गुजराती नामफलक त्वरित न हटवल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.