आता बेकायदा केबलविरुद्ध ठामपा राबविणार मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:38+5:302021-09-23T04:46:38+5:30
ठाणे : महापालिका क्षेत्रातील वृक्ष, विद्युत खांबांवर विनापरवाना टाकलेल्या इंटरनेट तसेच इतर केबलमुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची भीती व्यक्त ...
ठाणे : महापालिका क्षेत्रातील वृक्ष, विद्युत खांबांवर विनापरवाना टाकलेल्या इंटरनेट तसेच इतर केबलमुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या विद्युत विभागाने अशा बेकायदा केबल काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे.
गुरुवारपासून ही कारवाई होणार असून, बेकायदा केबल टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हेही दाखल होणार आहेत. यामुळे शहरातील अनेक भागातील इंटरनेट सेवा आणि टीव्ही केबल सेवा बंद होण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात इंटरनेट तसेच इतर केबल टाकायच्या असतील तर, त्यासाठी संबंधित पुरवठादारांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशा वाहिन्या भूमिगत टाकण्यासाठीच पालिका परवानगी देते. त्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून ठरावीक शुल्क आकारते. गेल्या काही वर्षांत हे शुल्क चुकविण्यासाठी अनेक पुरवठादारांनी पालिकेच्या परवानगीविनाच केबलचे जाळे विणले आहे. शहरातील झाडांसह विद्युत खांबांवर अशा केबल टाकल्या आहेत. यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. हा मुद्दा सभागृह नेते अशोक वैती यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. यावर विधि विभागाचे प्रमुख ॲड. मकरंद काळे यांनी एखाद्या कंपनीने महापालिकेच्या परवानगीविना केबल टाकली असेल तर त्या दुर्घटनेची जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, असे उत्तर दिले. केवळ नोटीस देण्यापुरती कारवाई करू नका तर केबल काढून टाका, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानंतर अशा सर्व केबल्सवर तत्काळ कारवाई करून यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून ही कारवाई सुरू होणार आहे.
........
बेकायदा केबल काढून टाकण्यासाठी संबंधितांना १६ सप्टेंबरला नोटीस दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने केबलविरोधात कारवाई सुरू करणार आहे.
- विनोद गुप्ता, उपनगर अभियंता, विद्युत विभाग
------------------