ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान

By सुरेश लोखंडे | Published: December 30, 2023 06:48 PM2023-12-30T18:48:50+5:302023-12-30T18:50:35+5:30

५१ लाखांपर्यंत बक्षिसे!

Now Chief Minister My School Beautiful School campaign in schools of Thane district | ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान

ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक व उत्तम नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून एक लाखापासून ५१ लाखांपर्यंतची बक्षिसे उत्कृष्ट उपक्रमास प्राप्त हाेणार आहेत. यासाठी महापालिकां क्षेत्रातील शाळांसह जिल्ह्यातील तालुक्यांमधील माध्यमिक व प्राथिमिक शाळांना सहभागी हाेण्याची संधी आहे.

या अभियानासाठी शाळांची अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिकपासून राज्यस्तरापर्यंत प्रत्येक स्तरातील विजेते या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहेत.तालुका, जिल्हा तसेच विभागीय पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी पहिले पारितोषिक ५१ लाख रुपये, दुसरे पारितोषिक २१ लाख रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ लाखांचे राहणार आहे, यासाठी ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी त्यांच्या जिल्ह्यशतील शाळांना परिपत्रके काढून माेठ्या संख्येने सहभागी हाेऊन विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या विद्यार्थीकेंद्रित अभियानाचा कालावधी ४५ दिवसांचा आहे. आरोग्य आर्थिक आणि कौशल्य विकासावर यातून भर दिला जाणार आहे. भौतिक सुविधा पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व अन्य अभियान उपक्रमातून राबविले जाणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे, अध्ययन-अध्यापन आणि प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक आणि आनंददायी वातावरण निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अभियान राबविले जात आहे.
  
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. विजेत्या शाळांना रोख पारितोषिक दिली जाणार आहेत. यासाठी शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. शाळांमधील शिक्षक, पालक विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये हे अभियान हाती घेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी प्राथमिकस्तरावर केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सेवाज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी, संबंधित उपशिक्षणाधिकारी तसेच राज्यस्तरावर निर्देशित अधिकारी मूल्यमापन करतील. मुल्यमापनानंतर रोख पारितोषिकांचे वितरण होईल.

Web Title: Now Chief Minister My School Beautiful School campaign in schools of Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे