आता प्रदूषण केमिकलच्या तवंगामुळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:03 AM2019-11-21T00:03:06+5:302019-11-21T00:03:10+5:30
नाल्यावर पसरलेले तवंग काढले; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने
डोंबिवली : खंबाळपाडा परिसरातील प्रदूषणाला रंगाने माखलेल्या गोण्या धुणारा भंगारवाला कारणीभूत असल्याचा जावईशोध लावणाऱ्या कामा संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आता या परिसरातील एका नाल्यावर तेल सदृश्य केमिकलचा तवंग पसरल्याचे आढळून आले आहे. हा तवंग काढण्याचे काम बुधवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सुरू होते. कोणत्या तरी कंपनीतून हे केमिकल आले असावे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे तर कोणीतरी हे केमिकल नाल्यात टाकले असावे, असा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. आता हा केमिकलचा तवंग काढल्यानंतर तरी या भागातील वायूप्रदूषण थांबते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर तीन दिवस थांबलेला खंबाळपाडा भोईरवाडी परिसरातील वायुप्रदूषणाचा त्रास रविवार मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झाला. सोमवारी दिवसभर प्रदूषणाचा दर्प कायम राहिल्याने रहिवासी संतप्त झाले होते. प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतरही कोणतीही दखल न घेतली गेल्याने संतापलेले रहिवासी सायंकाळी रस्त्यावर उतरले होते. यात घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या कामा संघटनेच्या माजी पदाधिकाºयाला घेराव घालून जाब विचारण्यात आला. या प्रदूषणाची दखल मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शंकर वाघमारे यांना ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
बुधवारी पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि कामा संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने सकाळपासून शोधमोहीम सुरू झाली. या मोहिमेत भोईरवाडीतील एका नाल्यात केमिकलचा तवंग पसरला असल्याचे आढळले. याचमुळे दर्प पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अखेर हा तवंग काढण्यास सुरुवात झाली. नाल्यातील दोन ते तीन भागांत हा तवंग होता. सायंकाळी पाचपर्यंत तवंग काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या तवंगाचे नमुने तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी घेतले आहेत. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे हे स्वत: उपस्थित होते.
नमुने घेतले आहेत आता पाहू!
ज्याठिकाणचा तवंग काढण्यात आला आहे त्याभागातील दर्प कमी झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी नमूने घेतले आहेत. कोणत्या कंपनीतून केमिकल आणले गेले अथवा सोडण्यात आले असावे त्याचा शोध ते घेणार आहेत. आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता; पण आता दोन-चार दिवस थांबून परिस्थितीमध्ये काही बदल होतो का ते पाहू, असे खंबाळपाडा येथील रहिवासी काळू कोमास्कर यांनी सांगितले.
वास आल्यास तत्काळ कळवावे
नाल्याच्या पाण्यावर तेलमिाश्रत केमिकलचा तवंग आढळून आला आहे. ते आम्ही काढून टाकले आहे. कोणीतरी नाल्यात ते केमिकल आणून टाकले असावे असे आम्हाला वाटते. पण पुन्हा वास आल्यास तत्काळ कळवावे. - शंकर वाघमारे, प्रादेशिक अधिकारी कल्याण,
प्रदूषण नियंत्रण मंडळ