आता अखंड हिंदू राष्ट्राचे तात्यारावांचे स्वप्न पूर्ण होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 12:36 AM2019-06-01T00:36:33+5:302019-06-01T00:36:58+5:30
स्वातंत्र्यवीरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर : मोदी सरकारचा सावरकरांनाही आनंद झाला असता
ठाणे : आता आपलं सरकार आलं आहे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं, अशीच तात्यारावांची इच्छा होती. त्यामुळे आज तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. हे सरकार आल्याने सगळ्यांची भरभराट होईल, सगळ्यांना चांगले दिवस येतील आणि लवकरच राम मंदिर बांधले जाईल, असा विश्वास वाटतो, असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर यांनी काढले.
ठाण्यातील पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुंदरबाई तसेच सावरकरांची नात असिलता राजे उपस्थित होत्या. यावेळी ‘जयोस्तुते’ पुस्तकाच्या लेखिका साधना जोशी यांनी सुंदरबाई यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. लग्नापूर्वी मला स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात तात्याराव हे फक्त कवी म्हणूनच माहीत होते. पण, लग्नानंतर तात्यारावांच्या थोर कार्याची माहिती झाली. माझे आणि विश्वासरावांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने झाले. कारण, त्याचदरम्यान गांधीजींची हत्या झाली होती. सासरी घरात वातावरण अतिशय कडक आणि शिस्तशीर होते. कोणतीही गोष्ट ही वेळेतच व्हावी, असा तात्यारावांचा आग्रह असायचा.
तात्यारावांच्या भाषणांना कुटुंबातील व्यक्तींनी सुरक्षेच्या कारणास्तव येऊ नये, असे ते कायम म्हणायचे. तरीही, एकदा मी त्यांचे भाषण ऐकायला गेले होते. ते समजल्यावर तात्याराव माझ्यावर रागावले होते, असेही सुंदरबाई यांनी सांगितले. तात्याराव विज्ञाननिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नातीचा जन्म झाला, तेव्हा मात्र घरी आल्यावर त्यांनी तिची दृष्ट काढण्यास सांगितले, ही आठवण सांगताना त्यांनी तात्यारावांच्या कुटुंबवत्सलतेचा दाखला दिला. तात्याराव माईंशी बोलताना अनेकदा अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेबद्दल बोलायचे. मात्र, कधीही त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेले मी पाहिले नाही. माईंचे निधन झाल्याची वार्ता जेव्हा तात्यारावांना समजली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माई गेली, तिचं सोनं झालं, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
त्याकाळी आमच्या घरी मंगेशकर कुटुंबीयांचे येणेजाणे असायचे. दीनानाथ मंगेशकर नाटकासंदर्भात चर्चा करण्यासाठी यायचे. तर, लतादीदी गप्पा मारायला यायच्या. तात्याराव आणि लतादीदीचे तर वडील-मुलीप्रमाणे नाते होते, असेही सुंदरबाई म्हणाल्या.