आता आषाढातही शुभमंगल सावधान! चतुर्मासात काढीव मुहूर्तावर होत आहेत विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:35+5:302021-07-16T04:27:35+5:30
ठाणे : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जात होती. मात्र, कोरोनामुळे यंदा चतुर्मासातही लग्न केली जात आहेत. त्यामुळे या आषाढ ...
ठाणे : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जात होती. मात्र, कोरोनामुळे यंदा चतुर्मासातही लग्न केली जात आहेत. त्यामुळे या आषाढ महिन्यातही शुभमंगल सावधान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंचांगकर्त्यांनी काढीव मुहूर्त दिल्यामुळे चतुर्मासात विवाह करण्याची संख्या वाढली आहे.
विवाह मुहूर्तासाठी शुद्ध मुहूर्त आणि गौण म्हणजेच काढीव मुहूर्त काढले जातात. २० जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने १३ जुलै हा शुद्ध मुहूर्ताची शेवटचा मुहूर्त होता. आता २० नोव्हेंबर रोजी थेट शुद्ध मुहूर्त आहे. कोरोनामुळे चतुर्मासात काढीव मुहूर्ताच्या तारखा खालीलप्रमाणे-
जुलै : २२, २५, २६, २८, २९
ऑगस्ट : ३, ४, ११, १२, १४, १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१
सप्टेंबर : १, ८, १६, १७
ऑक्टोबर : ८, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०
नोव्हेंबर : ८, ९, १०, १२, १६
--------------------------------
आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी या काळाला चतुर्मास म्हणतात. या चार महिन्यांत विवाह करणे अशुभ मानले जाते. त्या वेळी विवाह होत नव्हते, असे प्राचीन ग्रंथात लिहिले आहे. परंतु, काही ग्रंथांत असेदेखील लिहिले आहे की, अडीअडचणी वेळी काढीव मुहूर्तावर विवाह करायला हरकत नाही. दोन वर्षांपासून आम्ही पंचागकर्ते चतुर्मासात वेगळे विवाह मुहूर्त देतो. पहिले शुद्ध मुहूर्तच्या तारखा देतो आणि काढीव मुहूर्ताच्या वेगळ्या तारखा देतो. पूर्वी पावसाळ्यात जाणे-येणे कठीण होणे. शेतीची कामेदेखील असत म्हणून या चार महिन्यांत विवाह मुहूर्त नसावेत. परंतु, आता लोकसंख्या वाढली, परदेशातून माणसे येत आहेत, म्हणून या काळात विवाह करायला हरकत नाही, असे पंचांगकर्त्यांनी ठरवले आणि २ वर्षांपूर्वी सोलापूर येथे बैठक पार पाडली. नक्षत्र, तिथी पाहून काढीव मुहूर्त काढले जातात.
- दा. कृ. सोमण, ज्येष्ठ पंचांगकर्ते
-------------