आता भरणार ‘आगरी शाला’, १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:51 PM2018-04-22T16:51:29+5:302018-04-22T16:51:29+5:30
उन्हाळ्याच्या सुट्टीत आगरी शाला भरली जाणार आहे. १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात येणार आहे.
ठाणे : १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे. ‘आगरी शाला’ याचे प्रशिक्षण वर्ग भिवंडीतील कशेळी गावात भरणार आहेत. या ‘आगरी शाला’ प्रयोगासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे.
मुंबई-ठाणे-रायगड-नाशिक मधील स्थानिकांची बोली म्हणजे आगरी बोली. प्रसार माध्यमात तसेच विविध मालिकांमध्ये सर्रास वापरली जाणारी बोली तिच्या गोडव्यामुळे आपल्याला ठाऊक आहे. परंतू अनेकांना या भाषेचे नेमके पैलु माहित नाहीत. तसेच ईंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली आगरी बोलीचा वापर हा कमी होत चाल्ला असून परिणामी ही बोली बोलणार्या वर्गाला ह्या भाषेचा विसर पडत चाल्ला आहेच. ह्यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रविंद्र तरे यांनी १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे. सर्वेश तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून ९० व्या अ.भा साहित्य संमेलनातील बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रयोगासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील,आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील,आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील,९० व्या अ.भा साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डाॅ.अनिल रत्नाकर,प्रसिध्द कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच लोकगीतातील गीतकार संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या ‘आगरी शाला’ प्रयोगा अंतर्गत सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लघु पाठ्यक्रम असलेल पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्य चा समावेश असेल,याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी स्वत: केले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त आगरी भाषा प्रेमींनी मग ते कोणत्याही वयोगटातले असोत त्यांनी सहभाग घ्यावा असे सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून इच्छूकांनी आपली माहिती sarvyatare@gmail.comवर पाठवावी वा ९०९६७२०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या आगरी बोलीतील प्रयोगानंतर इतरही बोलीत असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डाॅ.अनिल रत्नाकर यांनी सांगीतले आहे.