आता आॅनलाइनद्वारे भरा कर; केडीएमसीने दिले पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:40 AM2018-09-16T03:40:22+5:302018-09-16T03:40:50+5:30
केडीएमसी हद्दीतील नागरिकांना विविध कर व सेवा शुल्क भरण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये आता रांगा लावण्याची गरज नाही.
कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरिकांना विविध कर व सेवा शुल्क भरण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये आता रांगा लावण्याची गरज नाही. आॅनलाइन पद्धतीने करभरणा करण्यासाठी महापालिकेने त्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आॅफलाइन पद्धतही सुरूच राहणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली आहे.
विविध प्रकारचे कार्ड, नेट बँकिंगद्वारे नागरिकांना आॅनलाइन पेमेंट करता येणार आहे. सेवा कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांचे शुल्कही स्वीकारले जाते. आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि एसबीआय या बँकांचे पेमेंट गेटवे २०१६ पासून सुरळीत सुरू आहे. ‘स्मार्ट केडीएमसी’ या मोबाइल अॅप्सद्वारे पैसे भरण्याचा पर्याय आहे. नागरिकांनी भरलेली रक्कम व त्याच्या पावत्या या अॅप्सद्वारे उपलब्ध करून देता येतील.
इंडसइंड बँकेच्या काउंटरवरही नागरिक कर भरू शकतात. तसेच आयसीआयसी बँकेच्या देशभरातील कोणत्याही शाखेतून मालमत्ताकर व पाणी बिल भरता येऊ शकते, असे महापालिकेने कळवले आहे.
कॅशलेस पेमेंट व डिजीटल सेवेचा नागरिकांनी वापर करावा, यासाठी महापालिकेने या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘दी भारत बिल पेमेंट’द्वारे (बीबीएस) विविध सरकारी सेवांची देयके भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. या यंत्रणेशी महापालिकेची यंत्रण लवकरच जोडली जाणार आहे. आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पेमेंट जलद गतीने व पारदर्शक रक्कम अदा करण्यासाठीही सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे. क्युआरटी कोड हा नागरी सुविधा केंद्राच्या काउंटरवर उपलब्ध असेल, असे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
घरी जाऊनही देयके स्वीकारणार
महापालिकेच्या संकेतस्थळावरून पैसे भरताना डायनामिक क्युआर कोड उपलब्ध असेल. नागरी सुविधा केंद्रांवरही डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे बिल भरता येणार आहे.
‘क्विक पे’ सेवेनुसार नागरिकांना कोणत्याही पुनर्नोंदणीशिवाय विविध प्रकारची देयके भरता येणार आहे. याशिवाय आधार, भीम, आयएमपीएस, यूपीआय, मोबाइल वॅलेट, एनएसीएच या सुविधाही उपलब्ध आहेत.
नागरिकांच्या घरी जाऊन देयके स्वीकारण्याची अनोखी सुविधा देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.