‘होर्डिंग्ज’ प्रचाराला आता मर्यादा
By admin | Published: October 17, 2015 01:43 AM2015-10-17T01:43:37+5:302015-10-17T01:43:37+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे. परंतु, निवडणुकीच्या आचारसंहितेत होर्डिंग्ज लावण्याला मर्यादा घातली आहे. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला केवळ चारच होर्डिंग्ज लावता येणार आहेत. यात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रचार काळात किती बॅनर असावेत, किती प्रचार कार्यालये असावीत, याची एक आचारसंहिता ठरवून दिली आहे.
दरम्यान, मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत याचे काटेकोरपणे पालन न झाल्याचे केडीएमसी परिक्षेत्रात दिसून आले होते. महापालिकेने दिलेल्या परवानगीचे उल्लंघन सर्वच राजकीय पक्षांनी केले होते. बॅनर आणि होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण न ठरविल्याने सर्वत्र बेकायदा प्रचार फलकांचा सुळसुळाट झाला होता. (प्रतिनिधी)