आता खेळपट्टीतूनही मलिदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:34 AM2018-06-02T01:34:28+5:302018-06-02T01:34:28+5:30
मीरा- भार्इंदर महापालिकेच्या मैदानातील क्रिकेट सराव खेळपट्टी प्रशिक्षणासाठी भाड्याने देण्यासाठीही गैरप्रकार
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या मैदानातील क्रिकेट सराव खेळपट्टी प्रशिक्षणासाठी भाड्याने देण्यासाठीही गैरप्रकार चालवल्याचा प्रकार उघड झाला आहे. दोन मैदानातील खेळपट्टी भाड्याने देण्याची निविदा आॅफलाईन तर एका मैदानातील खेळपट्टी निविदा मात्र आॅनलाईन काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थायी समितीनेही एका खेळपट्टीची निविदा ठोस कारण नसताना रद्द केली होती. यामुळे सत्ताधारी व प्रशासन यांचे साटंलोटं उघड झाल्याचा आरोप होत आहे. यात खेळाडूंचे मात्र नुकसान होत आहे.
मैदानांमध्ये क्रिकेटच्या सरावासाठी नेट लाऊन खेळपट्टया तयार करण्यात आल्या आहेत. काही खेळपट्या या पालिकेने संस्थांना भाड्याने दिल्या आहेत. शहरातील होतकरू खेळाडूंना शहरातच चांगले प्रशिक्षण मिळायला हवे अशी आहे.
पालिकेने नवघर येथील सचिन तेंडुलकर मैदान ४ तर सेव्हन स्वेक्अर शाळेमागील आरक्षण क्रमांक २४६ या मैदानातील ४ खेळपट्ट्या भाड्याने देण्यासाठी ११ मे २०१८ ला मिळकत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आॅफलाईन निविदा काढली. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही निवीदा टाकण्यात आली नाही.
एकीकडे दोन मैदानातील खेळपट्या भाड्याने देण्यासाठी आॅफलाईन निविदा मिळकत विभागाने काढलेली असताना पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ९ या कलावती आई मैदानातील एक खेळपट्टी भाड्याने देण्यासाठी २१ मे २०१८ ला आॅनलाईन निविदा प्रसिध्द केली.
यात विशेष बाब म्हणजे मिळकत विभाग व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे एकच व्यक्ती म्हणजे दीपक खांबित आहेत. वास्तविक सर्व निविदा या आॅनलाईन काढण्यासह त्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या गेल्या पाहिजेत. पण दोन मैदानातील खेळपट्टी भाड्याने देण्याची निविदा आॅफलाईन तर एका मैदानातील खेळपट्टीची निविदा आॅनलाईन काढल्याने यामागे गैरप्रकार असल्याचे स्पष्टच आहे. त्यातही मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर शाळेमागील मैदानात आधीपासूनच चार खेळपट्या असून तेथे नेट लाऊन वापर सुरु आहे.
बेकायदा वापर
खेळपट्या पालिकेने केल्या नसून खाजगी व्यक्ती ते बांधून बेकायदा वापर करून पालिकेचा महसूल बुडवत असल्याच्या तक्रारी आहेत.
परंतु सेक्टर ९ मधील मैदानातील खेळपट्टी तुटली असून त्याचे नेटही खराब झालेले असताना ते दुरूस्त न करताच पालिकेने पुन्हा आॅनलाईन निविदा मागवली. याआधी खेळपट्टी भाड्याने देण्यासाठी आॅनलाईन निविदा मागवण्यात आल्या होत्या.
दीड वर्षापासून पालिकेचा निविदा मागवण्याचा प्रकार सुरू आहे. या खेळपट्टीसाठी निविदा आल्याही होत्या परंतु स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली नाही.
सेक्टर ९ च्या खेळपट्टीची निविदा रद्द करण्यामागे शहरातील अशा सर्वच खेळपट्या आदींचे प्रस्ताव एकत्र आणा असे बांधकाम विभागास सांगितले होते. यात साटंलोटं वगैरे बिनबुडाचे आरोप आहेत.
- ध्रुवकिशोर पाटील,
सभापती, स्थायी समिती.
दोन विभागाने निविदा काढल्या असून मिळकत विभागातील कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने आॅफलाईन निविदा गेली आहे. ती आॅनलाईन काढली जाईल. सेक्टर ९ च्या खेळपट्टीला स्थायी समितीची मंजुरी न मिळाल्याने पुन्हा निविदा काढली आहे.
- दीपक खांबित,
कार्यकारी अभियंता.
खेळातही सत्ताधारी भाजपा व प्रशासन घाणेरडे राजकारण करत आहेत. मर्जीतल्या लोकांना काम देण्यासाठी पालिकेचे आर्थिक नुकसान व खेळाडूंना सरावापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. कारवाई झाली पाहिजे अशी तक्रार आयुक्तांकडे केली आहे.
- प्रमोद सामंत, माजी नगरसेवक.