...आता ठाण्यातही मोहल्ला क्लिनिक, महानगरपालिकेचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 12:54 AM2019-01-26T00:54:48+5:302019-01-26T00:55:00+5:30
दिल्लीत यशस्वी ठरलेली मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना आता ठाण्यातही राबवली जाणार आहे.
ठाणे : दिल्लीत यशस्वी ठरलेली मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना आता ठाण्यातही राबवली जाणार आहे. त्यासाठी आता महापालिकेने तयारी सुरु केली आहे. ज्या भागात महापालिकेची आरोग्य केंद्रे नाहीत, त्याठिकाणी ही मोहल्ला क्लिनीक सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. शहरात सुमारे ५५ ते ६० क्लिनीक या धर्तीवर उभारले जाणार आहेत. यासाठी महापालिका जागा देणार असून यामध्ये खाजगी संस्थेचे डॉक्टर आणि इतर स्टाफ कार्यरत असणार आहे. येथे रुग्णाला मोफत उपचार मिळणार आहेत. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.
दिल्लीत आप पक्षाच्या सरकारने ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली आहे. त्याच धर्तीवर आता ठाण्यातही ही संकल्पना पुढे आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या संकल्पनेतून या प्रयोगाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी ठाणे महापालिकेनेसुध्दा पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. ठाणे शहरात आजच्या घडीला २५ आरोग्य केंद्रे असून कळवा रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयही कार्यरत आहे. या दोन रुग्णालयांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण तपासणीसाठी येत असतात. परंतु त्यांचा वेळ खर्ची होत असतो. आरोग्य केंद्रातही अशा पध्दतीने तासन्तास रुग्ण रांगा लावून असतात. त्यामुळे त्यांच्याही वेळेचा खोळंबा होत असतो. केवळ २५ आरोग्य केंद्र असल्याने अनेकांना पायपीट करावी लागत आहे. रूग्णांची ही पायपीट आणि मनस्पात वाचविण्यासाठी ही संकल्पना पुढे आणण्याचा विचार असल्याची माहिती महापौरांनी दिली. या योजनेचा अभ्यास सुरु झाला असून शहरातील कोणत्या भागात आरोग्य केंद्र आहे, कुठे नाही, तसेच प्रभागाची लोकंसख्या याचाही अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यास झाल्यानंतर शहरातील कोणत्या ठिकाणी मोहल्ला क्लिनीक आवश्यक आहेत, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर खाजगी संस्थेच्या माध्यमातून या क्लिनीकमध्ये डॉक्टर आणि इतर स्टाफ ठेवला जाणार आहे. यासाठी येणारा खर्च पालिकेला उचलावा लागणार आहे. त्यांना जागासुध्दा पालिकेला द्यावी लागणार असून त्या क्लिनीकमध्ये औषधांचा साठासुध्दा पालिका पुरविणार आहे.
>गरिबांना मोफत उपचार
झोपडपट्टी भागातील गोरगरीब जनतेला मोहल्ला क्लिनीकमध्ये मोफत उपचार मिळतील. दोन महिन्यात याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्याचा विचार असून त्यानुसार पावले उचलण्यात येत असल्याचेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.