आता मोहाच्या फुलांपासून लाडू, कुपोषणावर उत्तम पर्याय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:03 AM2018-09-26T04:03:19+5:302018-09-26T04:03:33+5:30
ग्रामीण भागात पूर्वी सर्रास बनत असलेल्या मोहफुलांपासून बनवलेल्या गावठी दारूला विशेष महत्त्व होते. मात्र, मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिलांनी दारूबंदी करून याच फुलांचे जास्त आहारमूल्ये असलेले लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
मुरबाड - ग्रामीण भागात पूर्वी सर्रास बनत असलेल्या मोहफुलांपासून बनवलेल्या गावठी दारूला विशेष महत्त्व होते. मात्र, मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिलांनी दारूबंदी करून याच फुलांचे जास्त आहारमूल्ये असलेले लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. याने आदिवासी महिलांच्या व्यवसायात आणि जीवनात नवक्र ांती घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या लाडवांमुळे कुपोषणावरील एक उत्तम पर्याय समोर आला आहे.
महाराष्टÑातील बहुतांश जंगलात मोहाची झाडे आढळतात. मोहाला ग्रामीण भागात कल्पवृक्ष समजले जाते. मोहाचे लाकूड हे इमारतीचे काम तसेच फर्निचरसाठी उपयोगी असून फुले आणि फळे देखील उपयोगी आहेत. कच्च्या फळांची भाजी केली जाते तर फळांमधील बिया म्हणजे मोहटीपासून खाद्यतेल बनते. मात्र, फुलांचा सर्रास वापर हा ग्रामीण भागात गावठी दारू बनविण्यासाठी होत होता. या मोहाच्या गावठी दारूला मोठी पसंती मिळते. मात्र, या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याने आदिवासी महिलांनी दारूबंदी करण्यात आली.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिला या ‘वननिकेतन संस्थे’च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर गेल्या होत्या. तिथे गेल्यावर त्यांनी मोहफुलांपासून बनवलेले अनेक खाद्यपदार्थ पाहिले. यावेळी मोहफुलांची आहारमूल्ये तपासून त्यांची माहिती घेतली असता ते दूध आणि मनुकांपेक्षाही जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषणावर एक उत्तम पर्याय निघू शकतो. मोहफुलांमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, खनिजे, तंतूमय पदार्थ, ऊर्जा आणि ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळणाºया कुपोषण मुक्तीसाठी ही फुले वरदान ठरतील असा विश्वासही आदिवासी महिलांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागात मोहाची झाडे मुबलक असून या झाडांना मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान फुले येतात. ही फुले झाडावरून गळून पडतात. ती गोळा करून सुकविली जातात. या फुलांमध्ये काही घटक मिसळून त्याचे लाडू तयार करतात. हे लाडू वनविभागाने माळशेज घाट रस्त्यावरील नाणे घाट प्रवेशद्वाराजवळील विक्री केंद्रावर ठेवले असून पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मोहफुलांपासून लाडू, जॅम, सरबत, पुरणपोळी यांसारखे पदार्थ बनवतात. मुरबाडमधील आदिवासी महिलांनी देखील त्याची माहिती घेऊन मोहफुलांचे लाडू बनविण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे. या लाडवांना चांगली पसंती मिळते आहे.
- अॅड. इंदवी तुळपुळे,
अध्यक्ष, वननिकेतन संस्था, श्रमिक मुक्ती संघटना
मोहाच्या फुलांपासून लाडू बनवण्यामुळे होतकरू तरुणांना तसेच महिलांना रोजगाराचे साधन निर्माण होते आहे. यासाठी मोहाच्या झाडांचे संगोपन होणे गरजेचे आहे. त्यांना स्वयंरोजगारासाठी नागपूर गोंदिया येथे प्रशिक्षण देण्यात आले असून भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.
- संजय चेन्ने, वनक्षेत्र अधिकारी, टोकावडे