कचऱ्यावरही आता मासिक शुल्क ५० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:54 PM2019-07-20T22:54:53+5:302019-07-20T22:56:48+5:30
भाईंदर महापालिकेत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू
धीरज परब
मीरा रोड : सरकारने अधिसूचना काढून घनकचरा, स्वच्छता व आरोग्य उपविधी अमलात आणल्याने त्यानुसार मीरा-भाईंदर महापालिकेने नागरिकांकडून कचरा शुल्क वसूल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मालमत्ता देयकांमध्ये समावेश करून घरांना शुल्क आकारण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. तर, वाणिज्यवापरात विविध वर्ग केले असल्याने त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या वर्षात प्रत्येक घराकडून नऊ महिन्यांचे ४५० रु. शुल्क आकारले जाणार आहे. पुढच्यावर्षी ६३० रु., तर प्रत्येकवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. पहिल्याच वर्षात निवासी मालमत्तांमधून साडेतेरा कोटी, तर वाणिज्य आस्थापनांकडून साडेअकरा कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे.
अधिसूचनेनुसार मीरा-भाईंदर महापालिकेने गेल्यावर्षी आकारलेले घनकचरा शुल्क रद्द ठरले आहे. मंजूर केलेल्या दरानुसार आता महापालिकेने कचरा शुल्कआकारणी करण्याचा निर्णय घेत त्याबाबत बैठक घेतली. मीरा-भार्इंदर महापालिका ड वर्गात असल्याने नागरिकांना घरातील कचºयाचे शुल्क द्यावे लागणार आहे. प्रत्येक घरासाठी महिन्याला ५० रुपये याप्रमाणे वर्षाला ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. दुकाने, दवाखान्यांसाठी महिना ६० रुपये, उपाहारगृहे वा हॉटेल, फर्निचर, ऑटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक आदींच्या शोरूम, गोदामांना व ५० खाटांपेक्षा कमी रुग्णालयांना महिना १२० रु.प्रमाणे वार्षिक शुल्क द्यावे लागणार आहे. लॉजिंग व हॉटेलना महिना १६० रु. शुल्क असेल. शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, सरकारी व निमसरकारी कार्यालये यांना प्रतिमहिना ९० रु. शुल्क भरावे लागेल. विवाह कार्यालय, मनोरंजन सभागृह, एक पडदा चित्रपटगृहासाठी प्रतिमहिना १०००, तर खरेदी केंद्रे व बहुपडदा चित्रपटगृहांसाठी १५०० रु. प्रतिमहिना आकारले जाणार आहेत. शहरातील फेरीवाल्यांनाही महिन्याला १५० रु. शुल्क द्यावे लागणार आहे. महापालिकेकडे एकूण ३ लाख ५८ हजार ७९५ मालमत्तांची नोंद असून त्यातील २ लाख ९६ हजार ३७४ मालमत्ता निवासी स्वरूपाच्या आहेत. ५७ हजार ७४३ मालमत्ता वाणिज्य स्वरूपाच्या, तर ४ हजार ६७८ मालमत्ता संमिश्र प्रकारच्या आहेत. निवासी मालमत्तांच्या देयकात कचराशुल्क समाविष्ट करून त्याची वसुली करणे सोपे जाणार आहे.