यापुढे एक दिवसाआड पाणी ?
By admin | Published: January 26, 2016 02:01 AM2016-01-26T02:01:16+5:302016-01-26T02:01:16+5:30
सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील
कल्याण : सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली असून परिणामी कल्याण-डोंबिवलीसह इतर पालिकांवर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र महिनाभरातच कपातीचा दिवस वाढवून एक दिवसाआड पाणी पुरवण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा जलउद््भव असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सोमवारी ०. ८० मीटर इतकी खालावल्याने शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी लागू करण्यात आलेली ३० टक्के पाणी कपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावली आणि आम्हाला पाणीटंचाईतून वगळल्याची भूमिका त्यांनी गेतली. त्यांच्याकडून जास्तीचे पाणी उचलले जात आहे. त्यामुळे लघू पाटबंधारे विभाग नेमकी कोणती कारवाई करणार ते समजू शकलेले नाही.
कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग क्षेत्रांच्या कार्यालयाबाहेर पालिकेने उल्हास नदीतील पाण्याची पातळी खालावल्याचा फलक लावला आहे. उल्हास नदीतून कल्याण-डोंबिवली पालिकेप्रमाणेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आणि स्टेम पाणीपुरवठा योजना पाणी उचलतात. पाण्याचा प्रवाह नियमीत असल्यास बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जात नाही. सध्या तो कमी झाल्याने बारवी व आंध्र धरणातून दररोज एकूण एक हजार ५०० दशलक्ष पाणी लिटर सोडले जाते.
ही दोन्ही धरणे यंदा पूर्ण भरलेली नाहीत. त्यातील पाणीसाठयाचे नियोजन करण्यासाठी लघू पाटबंधारे खात्याने ३० टक्के पाणीकपात नोव्हेंंबरपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मिरा-भाईंदर पालिका हद्दीतील पाणी कपात रद्द करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून या महापालिकेने कपातीची अंमलबजावणी केली नाही. नदी पात्रातून दररोज जास्तीचे पाणी उचलले. त्याचा ताण कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागावर आला. नियोजन कोलमडून पडले. परिणामी, सोमवारी कल्याण-डोंबिवलीत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. काही भागात पाणीच आले नाही. शहरभर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. (प्रतिनिधी)