आता जागा मालकांवरही ‘एमआरटीपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:28 PM2018-11-25T23:28:27+5:302018-11-25T23:28:36+5:30
बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम : केडीएमसीची कारवाई सुरूच राहणार
- प्रशांत माने
कल्याण : केडीएमसीने २७ गावांमधील बेकायदा बांधकामांविरोधात नुकतीच विशेष मोहीम राबवली. पालिका आयुक्त गोविंद बोडके आणि बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या देखरेखीखाली झालेल्या या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई सुरूच राहणार असून बेकायदा बांधकामे उभी असलेल्या जमिनीच्या मालकांवरही महाराष्टÑ प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमांतर्गत (एमआरटीपी) कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
केडीएमसीच्या हद्दीतील बेकायदा बांधकामे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. महासभेत तहकुबी आणि लक्षवेधींद्वारे वारंवार लक्ष वेधले गेले आहे. पण, प्रभावी कारवाई होत नव्हती. आता बोडके यांनी पदभार स्वीकारल्यापासून पदपथावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम उघडली आहे. जोशींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागस्तरावर ही कारवाई सुरू आहे. ‘क’ आणि ‘ब’ प्रभागांत पदपथावरील अतिक्रमण हटवल्यानंतर २७ गावांतील बेकायदा बांधकामांविरोधात सध्या कारवाई सुरू आहे. गुरुवारी आडिवली-ढोकळी ते पिसवलीदरम्यान झालेल्या कारवाईवेळी जोशी यांच्यासोबत दस्तुरखुद्द बोडके घटनास्थळी होते.
‘क’ प्रभागात पदपथावरील अतिक्रमणांसंदर्भात झालेल्या कारवाईवेळीही आयुक्त स्वत: उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे २७ गावांमध्ये कारवाईदरम्यान बोडके आणि जोशी यांनी केलेल्या दौऱ्याच्या वेळी आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणावर ‘ब’ प्रभागात बांधकामे उभी राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तब्बल ४० बांधकामे अशा प्रकारे आढळून आली. त्यासह अन्य बांधकामांनाही नोटिसा बजावल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे. दिवाळी सुटीच्या कालावधीत उभ्या राहिलेल्या बांधकामांचीही माहिती मागवली आहे. ही संख्या कमी असून त्यांच्यावरही कारवाई होणार आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.
‘ह’ प्रभागातही विशेष मोहीम
‘ई’, ‘आय’, ‘अ’ आणि ‘ह’ प्रभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. स्थानिक प्रभागक्षेत्र अधिकाºयांचा याकडे कानाडोळा होत असताना बेकायदा बांधकाम नियंत्रक विभाग कारवाईसाठी सज्ज झाला आहे. २७ गावांपाठोपाठ हा विभाग मोर्चा डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागाकडे वळवणार असल्याची माहिती मिळत आहे. याठिकाणी बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून २७ गावांप्रमाणे या ठिकाणीही प्रभावी कारवाई होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.