मीरा-भाईंदरमध्ये आता पुतळ्यांचे राजकारण

By admin | Published: October 6, 2016 03:06 AM2016-10-06T03:06:34+5:302016-10-06T03:06:34+5:30

राजमाता जिजाऊ, महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्यासह लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याचा प्रस्ताव

Now the politics of statues in Meera-Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये आता पुतळ्यांचे राजकारण

मीरा-भाईंदरमध्ये आता पुतळ्यांचे राजकारण

Next

धीरज परब, मीरा रोड
राजमाता जिजाऊ, महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्यासह लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याचा प्रस्ताव मीरारोड-भाईंदर महापालिकेच्या महासभेत मंजूर होऊन ३ महिने उलटले तरीही अद्याप कुठलीच हालचाल सुरु झालेली नाही. सत्ताधारी भाजपाने वरील पुतळ््यांचे प्रस्ताव बाजूला ठेवून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व सरदार वल्लभभाई पटेल यांचेच पुतळे उभारण्यासाठी निविदा बोलावल्याने आश्चर्य प्रकट करण्यात येत आहे.
महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती तर अनुक्रमे काशिमीरा नाका व फाटक येथे पूर्णाकृती पुतळे आहेत. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी तर तब्बल १० वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
पालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या वतीने ५ जुलै २०१६ रोजीच्या विशेष महासभेत माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा पूर्णाकृती पुतळा भार्इंदर पुर्वेच्या जेसल पार्क येथे खाडी किनारी तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा मीरा रोड पूर्वेच्या जोगर्स पार्कमध्ये उभारण्याचा प्रस्ताव आणला होता.
भाजपा आमदार तथा नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी हा ठराव मांडला तर अश्विन कासोदरीया यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, भगवती शर्मा आदींनी महाराष्ट्रातल्या संत, स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक यांची यादी मांडत सर्वांचे पुतळे व स्मारकं उभारण्याची मागणी केली होती. पण ती मागणी महापौर गीता जैन यांनी फेटाळून लावली.
शिवसेना गटनेत्या नीलम ढवण यांनी मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर होत असलेल्या सुशोभिकरणाच्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचा पूर्णाकृती पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात सावरकरांचा पुतळा, नवघर शाळा मैदानात सावित्रीबाई फुले यांचा तर मॅक्सस चौकी जवळ लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता.
महासभेत या विषयावर भाजपा वगळता इतर सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा ठराव नामंजूर होईल, अशी धास्ती निर्माण झाली होती. महापौर जैन यांनी महाराष्ट्राच्या या चारही थोर व्यक्तींचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची ढवण यांची सूचना मूळ ठरावात समाविष्ट करुन मंजूर केल्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात ठरावाच्या मसुद्यात मात्र ढवण यांची सूचना भाजपाने समाविष्ट केली नाही.
महापालिका प्रशासनानेही भाजपाच्या ठरावानुसार केवळ कलाम व पटेल यांचेच पुतळे बसवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची निविदा आॅगस्टमध्ये काढली होती. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा ४ आॅक्टोबरपर्यंत निविदेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
महासभेत राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या महान व्यक्तींचे पुतळे उभारण्याचा ठराव मंजूर झाल्याची कल्पना असतानाही भाजपाने महाराष्ट्राच्या मराठी मातीतील महान व्यक्तींना डावलल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. आता या मुद्द्यांवरूनही राजकारण होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.

Web Title: Now the politics of statues in Meera-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.