आता जव्हारच्या सुरक्षेला सीसीटीव्हीची साथ
By admin | Published: June 25, 2017 03:52 AM2017-06-25T03:52:00+5:302017-06-25T03:52:00+5:30
जव्हार शहरातील मुख्य १४ ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पोलीसांची नजर या परिसरावर राहणार आहे
हुसेन मेमन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार शहरातील मुख्य १४ ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पोलीसांची नजर या परिसरावर राहणार आहे. यामुळे शहराच्या सुरक्षेतही वाढ होणार आहे. आदिवासी विकास प्रकल्पाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागातर्फे पालघर जिल्हा आदिवासी उपायोजनेच्या निधीतून ही यंत्रणा बसविण्याचे काम पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी करून घेतले असून त्याचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे, सभापती ज्योती भोये, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप तेंडूलकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते हरी भोये, अर्शद कोतवाल, आदि उपस्थित होते.
नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तसेच तालुक्यातील गुन्हेगारी वृत्तीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहराच्या मुख्य ठिकाणी कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे घडून आले. हे कॅमरे चांगल्या प्रतीचे असून टॉवर व रेडीओ यंत्रणेचा वापर करून ते वायफाय ने जोडले गेले आहेत. अत्याधुनिक तंत्रामुळे या कॅमेऱ्याद्वारे छोट्या छोट्या हालचाली सुध्दा चित्रीत होत आहेत.
दिवसें दिवस वाढती गुन्हेगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. वाढती गुन्हेगारी व पोलिसांचे मनुष्यबळ कमी यामुळे त्यांच्यावर ताण पडत होता. या सुविधेमुळे तो कमी होईल. पोलीस यंत्रणेला गैरप्रकार तसेच गुन्हेगारीला आळा घालणे तसेच बेजाबादारीने होणारे अपघात, रोड रोमीओंचा उच्छाद, वाहतुकीचे मोडले जाणारे नियम यालाही प्रतिबंध घालता येईल.