आता लक्ष्य शून्य कचरा मोहिमेचे!
By admin | Published: January 23, 2017 05:21 AM2017-01-23T05:21:38+5:302017-01-23T05:21:38+5:30
केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना
कल्याण : केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना यावर उपाय म्हणून प्रत्येक प्रभागात शून्य कचरा मोहीम राबवण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याची माहिती स्थायी सभापती रमेश म्हात्रे यांनी दिली.
येत्या अंदाजपत्रकात विशेष आर्थिक निधीची तरतूद करणार असून स्वच्छतेची हमी देणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रभागांना तेथील सोसायट्यांना तसेच सामाजिक संस्थांना गौरवण्यात येऊन तेथील विकासासाठी राखीव निधी दिला जाईल, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
रविवारी कोपर रोड प्रभागात गावदेवी मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. अशी मोहीम एक दिवस राबवून कचऱ्याची समस्या सुटणारी नाही. त्यासाठी सर्वच प्रभागांत विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे म्हात्रे म्हणाले. वेंगुर्ला नगरपालिका स्वच्छतेबाबत राज्यात पहिला क्रमांक पटकावते. कागल नगरपालिका कचऱ्यापासून वीजनिर्मितीसारखा प्रकल्प उभा करते, अशी उदाहरणे समोर असताना आपल्याकडे गोळा होणाऱ्या ६५० टन कचऱ्यातूनही खत, वीजनिर्मितीसारखे प्रकल्प उभे राहू शकतात, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले.
कचरा आपल्या दारात नको, अशी प्रत्येकाची धारणा असते. डम्पिंगला विरोध होत असताना कचऱ्यावर उपाय म्हणून उभारणाऱ्या बायोगॅस प्रकल्पालाही ठिकठिकाणी हरकत घेत आहेत. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम नगरसेवकांनी करायला हवे. (प्रतिनिधी)